नागपूर : नागपूर शहरातील विधानसभेच्या सहाही जागा काँग्रेस लढवणार आहे. परंतु याबाबत माझे बोलणे योग्य नाही. हायकमांडच याबाबत स्पष्ट बोलू व सांगू शकतील, असेही विकास ठाकरे म्हणाले. परंतु शहरातील सहाही जागेबाबतच्या ठाकरेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे टेंशन वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील रविभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विकास ठाकरे यांनी विदर्भातील प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा प्रश्न विचारले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले, नागपूर मेट्रोचे उद्घाटन होऊन दशक उलटले तरी अद्याप काम अपूर्ण आहे. मेट्रोचा भ्रष्टाचार कॅगने उघड केला आहे, याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधत तुमचे सरकार भ्रष्टाचारी आहे का, असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी केला. ते गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे म्हणाले, नागपुरात ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या लहान बहिणीसमोर बलात्कार झाला. अद्याप आरोपी मोकाट आहेत. २०२३ मध्ये अशी २४७ प्रकरणे समोर आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नरजेत लाडकी बहीणचे संरक्षण कसे होते?, विदर्भात २०२३ मध्ये १,४३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांकडे तुमचे दुर्लक्ष का, असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

हेही वाचा >>>कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर

कापूस, सोयाबीन आणि संत्री उत्पादकांसाठी आयात- निर्यात नियम आणि हमीभाव यासारख्या न्याय धोरणाची अंमलबजावणी कधी करणार?, पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यावरही विदर्भात ४५ सिंचन प्रकल्प अपूर्ण का?, गडचिरोलीत मृत मुलाला १५ किलोमीटर पायी न्यावे लागले व अमरावतीत रुग्णवाहिकाअभावी गर्भवतीचा मृत्यू झाला, हाच सबका साथ, सबका विकास आहे का?, बुटीबोरीतील सोलर पॅनल प्रकल्प गुजरातला का हलवण्यात आला?, ५५ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाला तडे का गेले, असे प्रश्न विकास ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना विचारले. या पत्रपरिषदेला आमदार अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, संजय महाळकर आणि इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्री म्हणाले ” राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करतात….”

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांकडून वसुली करा

अंबाझरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने आरोपींवर गुन्हा दाखल झाला. हे कृत्य करणाऱ्या कंपनीच्या संचालकांकडून खर्चाची वसुली करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

राहूल गांधींवर वादग्रस्त वक्तव्यातून दंगे भडकवण्याचा प्रयत्न

शिवसेनेचा शिंदे गटाचा आमदार, भाजपचा खासदारासह इतर सत्ताधारी नेत्यांकडून काँग्रेस नेते राहूल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून वातावरन दुषीत करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहासह भाजपचे नेते त्यावर एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे या सगळ्यांच्या संमतीने हे वक्तव्य होत असून हा दंगे भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला.

लाडकी बहीण योजना निवडणूकपूर्व लाॅलीपाॅप

लाडकी बहीण योजना ही सत्ताधाऱ्यांनी निवडणूकीपूर्वी दिलेला लाॅलीपाॅप आहे. या योजनेबाबत महिलांमध्येच शंका आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास खालच्या वर्गातील महिलांसाठी नवीन योजना आणून दिलासा देईल, असेही विकास ठाकरे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikas thackeray statement regarding all the six seats in nagpur mnb 82 amy