बुलढाणा : “सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे”, असा सल्ला भाजपा नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलचे प्रेम बेगडी असल्याची टीकाही त्यांनी केली. काल रविवारी रात्री विखे शेगाव येथे मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यावर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत, ‘२०२४ नंतर भाजपा सरकार आले तर निवडणुका होणार नाहीत’ असे विधान केले होते. यावर बोलताना विखे म्हणाले की, पंचवीस वर्षे भाजपासोबत शिवसेनेने युती केली त्यावेळेस त्यांना उपरती झाली नाही. विश्वासघाताने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना हे वाक्य शोभत नाही. उलट त्यांनी आत्मपरीक्षण करावं हेच योग्य राहील.
हेही वाचा – चंद्रपूर: नगभीड तालुक्यातील सावरगाव तलावावर परदेशी राजहंस
उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना सावरकरांबद्दल दिलेल्या इशाऱ्यावर विचारले असता, त्यांच्या अधिपत्याखाली सरकार असताना औंरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीवर फूल उधळली गेली अन् त्यावेळी हे गप्प बसले. सत्ता गेल्यावर त्यांना आता सावरकर दैवत वाटायला लागलं, ही चांगली बाब आहे. मात्र ज्यांनी सत्ता मिळविण्यासाठी हिदुत्वाशी फारकत घेतली त्यांच्या तोंडी ही विधाने शोभत नाही. मुळात सावरकरांच्या बाबतीत बोलायचा त्यांना हक्कच नाही, असे विखे यांनी ठणकावून सांगितले.
मी लोकशाहीच्या रक्षणार्थ लढतोय हे ठाकरेंचे विधान म्हणजे मोठा विनोद आहे, अशा शब्दात विखे यांनी ठाकरेंची खिल्ली उडविली. आगामी निवडणुकांत भाजपा व उद्धव ठाकरे गटाची युती होणार काय, असे विचारले असता, हा जर-तरचा (हायपोथेटिकल) प्रश्न आहे. आमची युती तर बाळासाहेबांच्या सेनेसोबत आहे, असे विखे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – बुलढाण्यात ‘वंचित’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; मागण्या मान्य न झाल्यास ठोक मोर्चा
वाळू धोरण आणि दस्त नोंदणी
महसूल विभागाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी काळात सर्व दस्त नोंदणी ऑनलाइन झालेल्या असतील. त्या आधारेच नोंदणी होईल. असे झाले तरच गैरप्रकारांना आळा बसेल. नुकतेच पार पडलेल्या अधिवेशनात वाळू धोरण जाहीर करण्यात आले. वाळू माफिया राज संपविणे आमचे उद्धिष्ट आहे. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून रेती विक्री होणार असून ६०० रुपये बेसिक दर असेल, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.