बुलढाणा : जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतपैकी एक असलेल्या डोनगावच्या ( ता. मेहकर) ग्रामविकास अधिकारी आणि महिला सरपंच यांच्यातील भ्रष्टाचाराचे खुले समर्थन करणारी एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे.  ‘खाणे’ तर आपला अधिकारच, मतदार चोरच आहे, असा सल्ला ते महिला सरपंचाला देत असल्याचे त्यात दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गडचिरोली : धान खरेदी घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर ; दरवर्षी संगनमताने होतो कोट्यवधींचा भ्रष्टाचार

ग्राम पंचायत कार्यालयात अलीकडेच झालेल्या एका चर्चेत ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे, नवनिर्वाचित महिला सरपंच रेखा पांडव व इतर पदाधिकाऱ्यांना व्यावहारिक ज्ञान देत असल्याचे दिसून येते. कामे आणि  ‘व्यवहारा’वर विषय निघाला असता  ग्रामविकास अधिकाऱ्याने, ‘आपण इथं  खाण्यासाठीच बसलो असून खाणे हा आपल्याला मिळालेला अधिकारच आहे,’ असा ‘रोख’ठोक सल्ला महिला सरपंचाला दिला.

हेही वाचा >>> बुलढाणा : शिक्षकी पेशाला काळिमा ; शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहिली अन्…

‘जनतेचा बाऊ करू नका,  तुम्ही कसेबी वागले तरी वाईटच राहता, तुम्ही रस्त्यावर सोन्याचे पत्रे बी लावले तरी हे त्यातबी खोट काढतील. यांनीच कुठे फुकटात मतदान केले ? ते चोरच आहे,’ असे बेताल वक्तव्य ते करीत असल्याचे या चित्रफितमध्ये दिसत आहे. या चर्चेत रवी पांडव, कर्मचारी परमाळे, घोगलदेखील हजर असल्याचे दिसून येते.

अहवाल मागवला : सदस्य आखाडे

हा संवाद  समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने डोनगावमध्ये खळबळ उडाली. चनखोरे यांनी ही चित्रफित बनावट असल्याचा दावा केला. सरपंच आणि सचिवाला बदनाम करण्याचा हा विरोधी गटाचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितावर कारवाई करण्यासाठी आपण पाऊले उचलणार, असेही ते म्हणाले. उपसरपंच इंगळे, सदस्य आखाडे यांनी ही बाब  लाजिरवाणी असल्याचे सांगितले. आखाडे यांनी सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगून नियमानुसार  कार्यवाही होईल, असे स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village development officer to women sarpanch says bribe is our right voters are thieves zws