भंडारा : गावातील एका ट्रॅक्टरच्या दुकानात चोरी झाली. रात्री बे-रात्री फिरणाऱ्या टवाळखोर तरुणांनीच चोरी केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या एकाचा १५ एप्रिल रोजी सकाळी उपचारादरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पहेला गावात शनिवारी मध्यरात्री घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री गावातील एका ट्रॅक्टरच्या दुकानात लोखंडी रॉडची चोरी झाली. गावातील टवाळखोर तरुणांनीच चोरी केल्याच्या संशयावरून २० ते २५ जणांनी चौघांना जबर मारहाण केली. यात उपचारा दरम्यान एकाच मृत्यू झाला.
तर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे अड्याळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पाटील यांनी सांगितले. आरोपी आणि चोरीच्या संशयावरून मारहाण झालेल्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.