लोकसत्ता टीम
नागपूर: विविध विकास योजनांसाठी निधी मंजूर असताना प्रशासनाने ती कामे पावसाळा सुरू झाला तरी हाती घेतली नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
जिल्हा वार्षिक योजना (नागरी सुविधा जनसुविधा) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास आणि २९ टक्के सेस फंड इत्यादी मधून होणाऱ्या कामांसाठी कामठी तालुक्यातील बिडगाव ग्रामपंचायतला निधी मंजूर झाला आहे. बिडगावला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मार्च २०२३ ला मंजूर करण्यात आला. ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु आता पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकाही कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे व आशीष मल्लेवार यांच्या नेतृत्वामध्ये बिडगाव ग्रामपंचायत कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.