लोकसत्ता टीम
नागपूर: भंडाऱ्यातील जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी जीवितहानी हानी झाली. आजूबाजूच्या गावातील रहिवासी भयभीत झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर परिसरात गावकरी सांगतात स्फोट इतका भीषण होता की दुर्घटनेनंतर बिल्डिंगचे पत्रे सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडलेत. साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा स्फोट झाला. दुर्घटनेनंतर दोन कामगारांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले . तर सध्या बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आठवर पोहचल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला तेव्हा तेथे एकूण १४ कामगार काम करीत होते . सात कामगार मलब्याखाली दबून असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सध्या त्यांचा शोध घेण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी युद्धस्तरावर काम करीत आहे.
सकाळी १० वाजताच्या सुमारास मोठा आवाज झाला. दहा ते बारा गावांना हादरे बसले.सिमेंट पत्र्याचे तुकडे लगतच्या गावात पडले. सुरूवातीला नेमके काय झाले हे कोणालाच कळले नाही. परंतु जेव्हा दारूगोळा कारखान्यात स्फोट झाल्याची बातमी आली तेंव्हा आजूबाजूच्या गावातील रहिवासी घाबरले. कारण त्यांच्या गावातील कामगार या कारखान्यात काम करीत होते. त्यांच्या नातेवाईकांनी कारखान्याकडे धाव घेतली.पण कारखान्याचे प्रवेशव्दार बंद होते. त्यामुळे आतमध्ये काय सुरू आहे हे कळला मार्ग नव्हता.