वर्धा: अद्याप अनेक गावात दळणवळणाच्या सोयी झालेल्या नाहीत. त्यामुळे पूर आला की गावकऱ्यांची चांगलीच दैना उडते. म्हणून सोय निर्माण व्हावी यासाठी स्थानिक पुढारी धडपडत असतात. वर्धा लोकसभा मतदारसंघातील उडखेड हे असेच एक गाव पुराने ग्रस्त असलेले. या गावाला जोडणारा मार्ग रेल्वेने बाधित झालेला. त्यामुळे उडखेद ते तरोडा असा रेल्वे पूल व्हावा म्हणून गावकरी कित्येक तपापासून प्रतीक्षेत होते.
अखेर खासदार रामदास तडस यांनी हा प्रश्न हाती घेतला. रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अखेर हे काम मार्गी लावून त्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले. गावकरी कामाच्या भूमिपूजनाच्या तयारीला लागले. बायाबापड्यांनी गाव साजविले. कामाचे शिलेदार खासदार तडस यांच्यासाठी बैलबंडी सजविण्यात आली. त्यात त्यांना बसवून कार्यक्रम स्थळी नेण्यात आले.
हेही वाचा… पोलिसांच्या वेतनात वृद्धी पण पदोन्नतीत विषमता कायम! आश्वासित प्रगती योजनेबाबत कर्मचाऱ्यांची नाराजी
पूजनाची कुदळ पडली आणि गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. हा आनंद त्यांनी आजवर सोसलेल्या वेदनेवरील दिलासा होता. भाषण देताना खासदार पण गदगदित झाले. हे काम किती महत्वाचे होते हे आज दिसून आले असून मोदी सरकार असाच प्रत्येक गावाचा विकास करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.