बुलढाणा : मार्च महिन्याच्या मध्यावर पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून हजारो ग्रामस्थांची तहान टँकर आणि अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे करण्यात पाणी पुरवठ्या द्वारे भागविली जात आहे. यावर कळस म्हणजे केंद्रीय आयुष कुटुंबं कल्याण,आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या  गृहक्षेत्रात अर्थात मेहकर विधानसभा मतदारसंघात पाणी पेटल्याची चिन्हे आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असतानाही यंदा मार्च महिन्याच्या  प्रारंभीच पाणी टंचाईने डोके वर काढले. अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठ्याचे दुष्टचक्र सुरु झाले आहे हजारो गावकऱ्यांची तहान या विहीर भागवीत आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि जलस्रोत नसलेल्या गावातील रहिवासी प्रामुख्याने आया बहिणींची घडाभर पाण्यासाठी कैक मेल भटकंती सुरु झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आठ गावांना खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला. मात्र आठ दिवसातच खाजगी विहिरीद्वारे होणाऱ्या  पाणी पुरवठ्याची तीव्रता चारपटीने वाढली आहे. सध्या  जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७ गावांना ४२ खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

मेहकरात जास्त तीव्रता

तसेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात टँकरची धडधड सुरु झाली आहे. चार गावात  टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला आहे. केंद्रीय राज्य मंत्री यांच्या गृह मतदारसंघातील मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे, पारडी, जवळा आणि वरवंड या गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे.  याशिवाय मेहकर मतदारसंघातील २२ गावांना २२ खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.मेहकर तालुक्यातील शेंदला, लवणा, मोळा, साबरा, खंडाला, उकळी, वरदडा, सुळा, खामखेड, अकोला ठाकरे, जयताळा, मोसंबेवाडी, पांगरखेड, रत्नापूर, सुकळी, पार्डी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड आणि लोणार तालुक्यातील कौलखेड, शारा या गावांचा समावेश आहे. टँकर ग्रस्त गावांची लोकसंख्याच साडेसात हजार इतकी आहे. यापरिणामी मेहकर मतदारसंघातील कमी अधिक चाळीस हजार ग्रामस्थांची तहान टँकर व विहिरीद्वारे भागविली जात असल्याचे विदारक चित्र आहे. आताच अशी स्थिती तर मे जून मध्ये किती बिकट स्थिती राहणार हे स्पष्ट होते.

देऊळगाव राजा मध्येही बिकट स्थिती

जिल्ह्यातील देऊळगाव राजा  तालुक्यातही टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे चित्र आहे.  या तालुक्यातील सहा गावांना अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. जास्त लोकसंख्येच्या अंढेरा  गावासाठी चार खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. यामुळे या गावाची तहान अधिग्रहित विहिरीद्वारेच भागवली जात आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. याशिवाय याच तालुक्यातील डोड्रा, बोराखेडी बावरा, डिग्रस खुर्द,

बानेगाव, या गावांनाही खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील बुट्टा, डावरगाव, धंदरवाडी, उमरद, बाळ समुद्र, बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे, घाटनांद्रा, देवपूर,   शेगाव तालुक्यातील जानोरी,  या गावातील रहिवासियांना खाजगी विहिरीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्या द्वारेच आपली तहान भागवावी लागत आहे.

यापूर्वी  मागील वर्षीच्या पावसाळयात  समाधानकारक पावसाची नोंद झाली. अवकाळी आणि  परतीच्या पावसाने तेरा पैकी अर्ध्याअधिक तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा  आकडा ओलांडला. यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र हा प्राथमिक अंदाज चुकीचा ठरला. यंदाच्या उन्हाळ्यात फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणी टंचाईने डोके वर काढले. दुसऱ्या आठवठ्यात पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे. या तुलनेत मे जून महिन्यात जिल्ह्यात प्रामुख्याने घाटावरील सहा तालुक्यात पाणी पेटणार हे नक्कीच…