अकोला रेल्वेस्थानकावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर बुधवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे शिवसेनेच्या दोन गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- नागपूर: सावधान! मुंबई, पुणे प्रवास करणार असाल तर आधी हे वाचा..
खासदार भावना गवळी आणि खासदार विनायक राऊत विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री दाखल झाले होते. दोन्ही खासदार अचानक समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘गद्दार-गद्दार’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यामुळे अकोला रेल्वेस्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. खासदार गवळी रेल्वेगाडीत बसल्यानंतरही त्यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके,’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रकार झाला. याप्रकरणी गवळी यांनी संतप्त भावना व्यक्त करून बुधवारी लोहमार्ग पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. राऊत आणि देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळेच माझ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या पत्नी, मुलीबद्दल असे कृत्य झाले असते, तर त्यांना चालले असते का? असा सवाल खासदार भावना गवळी यांनी केला. याप्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, बुधवारी रात्री अकोल्यातील जीआरपी पोलीस ठाण्यात खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध भादंवि कलम २९४ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचेही आंदोलन
उद्धव ठाकरे गटाच्या खासदार व आमदारांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात मंगळवारी घोषणाबाजी केली. याचा निषेध करण्यासाठी अकोल्यात बुधवारी सायंकाळी शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आले.