लोकसत्ता टीम
चंद्रपूर : आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या २४.६२ कोटी रुपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करून महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.
राज्याचे तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांना दिलेल्या तक्रारीत देशमुख यांनी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही नवीन कामाची ई-निविदा प्रकाशित करणे किंवा ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे हा आचारसंहितेचा भंग ठरतो. तरीसुद्धा मनपा आयुक्त पालीवाल यांनी १८ मार्च रोजी ‘चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्प’ या नवीन कामाची सुमारे २४.६२ कोटी रुपये अंदाजपत्रक असलेली ई-निविदा राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली.
आणखी वाचा- घड्याळ चिन्हाबाबत न्यायालयाच्या अटींचा नागपूर राष्ट्रवादीला विसर
आपत्कालीन परिस्थिती नसताना किंवा अत्यावश्यक काम नसताना तसेच सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता पालीवाल यांनी आचारसंहितेच्या काळात सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू करून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करून फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. विशेष म्हणजे, सुमारे एक वर्षाचा वर्धा जिल्ह्यातील कार्यकाळ वगळता पालीवाल हे सुमारे सात वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.
आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध केल्याचे भासवले
ऐन आचारसंहितेच्या तोंडावर १५ मार्च २०२४ रोजी तीन वर्तमानपत्रांमध्ये सदर ऑनलाईन ई-निविदेची जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये दिनांक १८ मार्चपासून सदर ऑनलाइन ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद केले. १५ मार्चपासून सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असे भासवण्याकरिता त्यांनी हे सर्व कटकारस्थान केले. ज्या तारखेला शासनाच्या वेबसाईटवर निविदा प्रपत्र विक्री करिता अपलोड होते त्याच तारखेपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होते याची पुरेपूर माहिती पालीवाल यांना आहे. असे असतानाही त्यांनी सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान सुरू केली व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही देशमुख यांनी तक्रारीत केला आहे.