नागपूर : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन मिळायले हवे. परंतु, राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये कमी विद्यावेतन देऊन निवासी डॉक्टरांची बोळवण करत आहे. यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संतप्त आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ऑनलाईन पद्धतीने पदव्युत्तर डॉक्टरांच्या शिक्षणासह समस्येबाबत सर्वेक्षण केले होते. त्यात १० हजार १७८ विद्यार्थी असलेल्या निवासी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी ७ हजार ९०१ विद्यार्थी हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. या सर्वेक्षणाचे विश्लेषण केले असता त्यात २ हजार ११० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळत नसल्याचे पुढे आले. ४ हजार २८८ पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिले जाणारे विद्यावेतन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरहून खूप कमी असल्याचे निदर्शनात आणले. तर १ हजार २२८ विद्यार्थ्यांनी त्यांना मिळत असलेले विद्यावेतन संबंधित महाविद्यालय व संस्था व्यवस्थापक परत घेत असल्याचे सांगितले. त्यावरून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने सगळ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनाही पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे विद्यावेतन देण्याच्या सूचना केल्या. या सूचनेच्या आधारे राज्यातील वैद्यकीय शिक्षण खात्यानेही २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सगळ्या खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालय व खासगी विनाअनुदानित पदव्युत्तर शिक्षण संस्थांना पत्र लिहून तेथील निवासी डॉक्टरांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयनुसार विद्यावेतन देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही निवडक खासगी वैद्यकीय महाविद्यालय सोडून इतर ठिकाणी खासगी वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांना शासकीयप्रमाणे विद्यावेतन मिळत नसून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या सूचनेला हरताळ फासल्या जात असल्याचे पुढे आले आहे.
हेही वाचा – अमरावती लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन गटांचा डोळा
नागपुरातील (हिंगणा) एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून विद्यावेतनासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या विषयावर नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा आणि वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा – नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणेच विद्यावेतन मिळायला हवे. परंतु, एखादे खासगी महाविद्यालय सोडले तर इतर महाविद्यालये या नियमाला हरताळ फासत आहे. विद्यावेतन हा निवासी डॉक्टरांचा हक्क आहे. तातडीने नियमानुसार हे विद्यावेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. – डॉ. सजल बंसल, राज्य महासचिव, महाराष्ट्र असोसिएशन बाॅन्डेड रेसिडेन्ट डॉक्टर.