वाशीम: मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जैन मंदिराचा वाद चिघळला आहे. मंदिर परिसरात श्वेतांबर पंथियांनी नियुक्त केलेल्या सेवकांकडून दिगंबर पंथीय आणि पुजाऱ्यावर हल्ले होत असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरपूर येथील अंतरीक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथे दूरवरून भाविक  दर्शनासाठी येतात. आधी मंदिराचा वाद न्यायालयात होता. ४० वर्षानंतर मंदिर खुले करण्यात आले. परंतु मंदिर सुरु झाल्यानंतर दोन पंथियात वारंवार वाद उफाळून येत आहेत. याबाबत दिगंबर जैन मुनी ऐल्लकश्री सिद्धांतसागरजी महाराज यांनी २६ जून रोजी वाशीम येथे आयोजित पत्रकार परिषदेत मोर्चाची माहिती दिली होती. त्यानुसार आज शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, दिगंबर पंथ मूळ  महाराष्ट्रीयन आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात गुजराती श्वेतांबर बांधवांकडून अरेरावी केली जात आहे.

हेही वाचा >>>काँग्रेस जाहिरनाम्यातील ‘अप्रेंटिसशिप’ योजना महायुतीच्या अर्थसंकल्पात

अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वाद हा फक्त मुख्य मूर्तीचाच होता व आहे. त्याबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही सध्या मंदिरामध्ये वारंवार वाद होत आहेत. ते क्षेत्रपालजींच्या मूर्तीवरून होत आहेत. तथापि श्वेतांबर बांधवांना  क्षेत्रपालजीच्या मूर्तीच्या पूजेचा कुठलाही अधिकार नसताना सदर मूर्तीकडे ते ताबा घेण्याच्या गैरहेतूने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे १२ ते १३ गुन्हे  शिरपूर जैन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र पोलीस प्रशासन श्वेतांबर बांधवांना त्यांच्याकडे क्षेत्रपालजींच्या  पूजेचा अधिकार आहे काय, याबाबत काहीही विचारणा करताना दिसत नाही. उलटपक्षी दिगंबर बांधवांना, ब्रम्हचारींना लक्ष्य केले जात आहे.  मंदिरासमोर जी मोकळी जागा आहे ती वाहनतळासाठी राखीव आहे. असे असतानाही  श्वेतांबर पंथीयांनी तेथे अनअधिकृत  मंडप उभा करून त्या मंडपामध्ये देव ठेवून पूजा सुरू केली आहे.  त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ते ज्या वाहनाने आले त्या वाहनांना ठेवण्यासाठी या परिसरात जागाच मिळत नाही.  परिणामी, ते रस्त्यात जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने उभी करतात.  त्यावरून गावकरी वारंवार व यात्रेकरू यांच्यात वाद होत आहेत. त्यामुळे हा मंडप तात्काळ हटवून वाहनतळाची जागा लवकरात लवकर मोकळी करावी, या व अशा विविध  मागण्यांकरिता हा विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violent agitation at the collectorate by the servants appointed by the shwetambara panthians washim pbk 85 amy