अमरावती : शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने जन्मदात्री आई आणि भावाला जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामा या गावात उघडकीस आली आहे.संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यातील व्यक्तीवर जीवघेणा हल्ल करण्यापर्यंत मजल जात आहे, हे रामा येथे घडलेल्या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
सुधीर रमेश फुके (५२), अंकुश सुधीर फुके (२४), प्रज्ज्वल सुधीर फुके (२६, तिघेही रा. रामा, ता. भातकुली) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी पंकज रमेश फुके (४१, रा. रामा) यांच्या नावावर गावातच दीड एकर शेती आहे. या शेतात त्यांनी तूर आणि हरभरा यासारख्या पिकाची लागवड केली आहे. त्यांचा मोठा भाऊ आरोपी सुधीर हा शेजारीच राहतो. गेल्या अनेक दिवसांपासून तो पंकज यांच्या शेतीत हिस्सा मागत आहे. घटनेच्या दिवशी त्याने या विषयावरून वाद घातला. त्यावेळी पंकज यांच्या आईने त्यांची बाजू घेताना आरोपी सुधीरला फटकारले. तू तुझ्या हिश्यातील शेती करीत जा. पंकजच्या शेतीतील कोणताही वाटा तुला मिळणार नाही, असे आईने म्हटल्यानंतर आरोपी सुधीर संतापला. त्याने स्वत:च्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पंकज यांनी विरोध केला, त्यावेळी आरोपी सुधीर यांच्या दोन मुलांनी पंकज यांच्यावर काठीने हल्ला केला. यात पंकज यांच्या आईला आणि डोक्याला दुखापत झाली असून पंकज हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.