वर्धा : सावज टिपायला गेला अन् स्वतःच सावज झाल्याची बाब अरण्यात नेहमीचीच म्हटल्या जाते. पण राजाच्या रुबाबात वावरणारा बिबट कोल्ह्याची शिकार करताना डोक्यावर आपटला, त्यातच त्याचा बळी गेला.
रोठा शिवारात बिबट व कोल्ह्याचा मृतदेह पडून असल्याचे माहीत झाल्यावर सहायक वन संरक्षक अमरजीत पवार व चमू घटनास्थळी पोहोचली. बारकाईने निरीक्षण केल्यावर बिबट्याच्या डोक्यावर मार दिसून आला. तर कोल्ह्याच्या शरीरावर जखमा आढळल्या. अंदाज घेतल्यावर झटापट झाली व त्यात नाल्याच्या खडकावर बिबट आदळला, असा निष्कर्ष काढण्यात आला.
मृत बिबटचे सर्व अवयव सुरक्षित असून ही मादी पंधरा महिन्यांची असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहांचा नियमानुसार पंचनामा करण्यात आला आहे.