नागपूर : काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिना निमित्ताने नागपुरात आज जाहीर सभा आयोजित केली असून या सभेला मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे व्हीआयपी पासधारक कार्यकर्ते प्रेस बॉक्स मध्ये शिरले. काँग्रेस आज शहरातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी सभेसाठी येत आहेत. याशिवाय विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तर पक्षाच्या विविध आघाड्यांचे (सेल) प्रमुख येथे पोहचले आहेत. काँग्रेस पक्षाच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेची जय्यत तयारी पक्षाने केली. पण गर्दी अधिक असल्याने गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.या सभेत तीन मोठ्या व्यासपीठावर पाचशेहून अधिक नेते, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी विराजमान आले आहेत. महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या शेजारच्या राज्यातून कार्यकर्ते, नागरिकांना एकत्र आले आहेत. एका खासगी बांधकाम कंपनीच्या सुमारे २४ एकर जागेवर ही सभा होत आहे. यासाठी तीन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत.सोनिया गांधी, राहुल गांधी अणि मल्लिकार्जुन खरगे थोड्याच वेळात सभास्थळी येतील, असे सांगितले जात आहे.