नागपूर : उन्हाळा सुरू झाला की माणसांचा जीव जसा पाण्यासाठी कासावीस होतो, तीच गत प्राण्यांचीसुद्धा! माणसांना पाणी लवकर उपलब्ध होते, पण प्राण्यांना पानवठ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहचून मग आपली तहान भागवावी लागते. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “के मार्क” नावाची ही वाघीण तहानलेली होती आणि मग आपल्या बछड्यासह ती पानवठ्याजवळ पोहचली. तहान भागेपर्यंत त्यांनी पाणी प्यायले आणि मगच ते या पाणवठ्यावरून बाहेर पडले. डेक्कनड्रिफ्टचे पीयूष आकरे यांनी हा सुंदर व्हिडीओ लोकसत्ताला उपलब्ध करून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलात नैसर्गिक पाणवठे तर असतातच, पण उन्हाळ्यात पाण्याची गरज अधिक असल्याने ठिकठिकाणी वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठेदेखील तयार केले जातात. या कृत्रिम पाणवठ्यात वनखात्याच्या खालच्या फळीतील कर्मचारी म्हणजेच वनमजूर, वनरक्षक सकाळ संध्याकाळ टँकर ने पाणी आणून टाकतात. काही कृत्रिम पाणवठ्याजवळ हातपंप बसवण्यात आले आहे तर आता बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वनमजूर, वनरक्षकाला प्रत्यक्ष पाणवठ्यावर जाण्याची गरज नाही.

हेही वाचा : वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सेमिकंडक्टर सुविधांची पायाभरणी, विद्यापीठातून थेट प्रक्षेपण

वन्यप्राणी हे पाणवठे भरण्याची जणू वाटच पाहात असतात. उन्हाळ्यात या पाणवठ्यावर सतत वन्यप्राणी दिसून येतात. त्यामुळे छायाचित्रकारांसाठी ती पर्वणीच असते. “के मार्क” ही वाघीणही तिच्या बछड्यांसह या पाणवठ्यावर आली आणि छायाचित्रकारांनी अलगद तिला कॅमेऱ्यात टिपले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘माधूरी’ नावाची एक प्रसिद्ध वाघीण होती. तर ‘खली’ नावाचा वाघही तेवढाच प्रसिद्ध. या दोघांचे अपत्य म्हणजेच ‘के मार्क’ वाघीण. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तीचा अधिवास. ती देखील आई झाली आहे आणि बछड्यांना तीने जन्म दिला आहे. ‘के मार्क’ ही वाघीण अतिशय धाडसी म्हणून ओळखली जाते. तेवढीच ती सुंदर देखील आहे. या वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या केसलाघाट आणि झरीपेठ जंगलावर आपली हुकूमत स्थापन केली आहे. अतिशय जोखमीच्या अशा वनक्षेत्रात ‘के मार्क’ वाघीण राहते. कारण तिच्या अधिवासातून राष्ट्रीय महामार्ग जातो.

हेही वाचा : जेनेरिक औषधांच्या माध्यमातूनही ‘भाजप’चा प्रचार!

अनेकदा ती हा महामार्ग ओलांडताना दिसून आली आहे. तर हिवाळ्यात ती बरेचदा या राष्ट्रीय महामार्गावरुन बऱ्याच लांब अंतरापर्यंत मार्गक्रमण करतानासुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे जंगलात पर्यटनासाठी जाणारे पर्यटकच नाही तर या महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनाही ती दर्शन देत असते.

तिच्या अधिवास क्षेत्रात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील प्रसिद्ध वाघ ‘मोगली’चा लहान मुलगा ‘छोटा मोगली’ आणि निमढेलावर राज्य करणारी ‘झरणी’ ही वाघीणसुद्धा अधूनमधून येऊन जाते. मात्र, ‘के मार्क’ वाघिणीच्या अधिवास क्षेत्रात तिचेच वास्तव्य आहे. यात ती कुणाला लुडबूड करु देत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of a tigress drinking water with her cub at tadoba andhari tiger reserve rgc 76 css