नागपूर : ‘वीरा – द क्वीन ऑफ बेलारा’… तिची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली. आठ-नऊ महिन्यापूर्वी ती आई झाली आणि दोन गोंडस बछड्यांना तिने जन्म दिला. ‘वीरा’ प्रमाणेच तिचे बछडेही कौतुक करावे असेच. कायम आईसोबत असणारे, तिच्यापासून फार दूर न जाणारे. दंगामस्ती करायची तर ती सुद्धा आईसमोरच. ‘वीरा’ आणि तिच्या बछड्यांमधील हा क्षण वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात काही दिवसांपूर्वीच ‘वीरा’ आणि ‘बेला’ या दोन वाघिणींमध्ये तुंबळ युद्ध रंगले. मोठ्या डरकाळ्या फोडत दोघीही एकमेकांवर धावून गेल्या. हे युद्ध पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले. त्याच्या काही क्षण आधीच ‘वीरा’ बेलारा या तिच्या हक्काच्या अधिवासात तिच्या बछड्यांच्या करामतीमध्ये दंग झाली होती. चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोनअंतर्गत बेलारा परिसरात तिचे वास्तव्य असते. बेलाराची राणी अशीही तिची ओळख आहे. ‘वीरा’ ही ‘जुनाबाई’ व ‘कंकाझरी’ यांची कन्या. ती या भागात प्रख्यात आहे.
हेही वाचा…video : रानगव्याचे रौद्ररूप पाहून वाघाने ठोकली धूम! ताडोबातील झुंझीचा थरार कॅमेऱ्यात कैद
‘झायलो’ या वाघासाबत ती अनेकदा दिसली आहे. तर हे बछडे देखील ‘झायलो’ व ‘वीरा’ यांचेच असल्याचे सांगितले जाते. लवकरच तिने बछड्यांना बाहेर घेऊन फिरण्यास सुरुवात केली. तिच्याइतकेच तिच्या बछड्यांनीसुद्धा पर्यटकांना लळा लावलेला. त्यांच्या करामती पाहण्यासाठी पर्यटक वाट बघत असतात आणि बछडेसुद्धा पर्यटकांना निराश करत नाही. या व्हिडीओत हे दोन्ही बछडे ‘वीरा’च्या अंगावर खेळताना दिसून येतात. सेलिब्रिटी अभिनेता, अभिनेत्री असो वा क्रिकेटपटू सर्वांसाठी ताडोबा ही पहिली पसंती ठरली आहे. अगदी जुन्या जाणत्या सेलिब्रिटीपासून तर आताच्या सेलिब्रिटींनी या व्याघ्रप्रकल्पाला एकदा नव्हे तर अनेकदा भेट दिली आहे.
हेही वाचा…आश्चर्य; लोणार सरोवर परिसरातील बिबट झाला सोनेरी…!
अलीकडेच भारतीय क्रिकेट जगतातील दोन दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकर आणि गोलंदाज अनिल कुंबळे व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येऊन गेले. या दोघांनाही वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या वाघांनी दर्शनही दिले. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर हा वर्षातून किमान दोनदा तरी या व्याघ्रप्रकल्पात हजेरी लावतो. विदेशातील क्रिकेटपटूंनाही ताडोबातील वाघांनी वेड लावले आहे. या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या अनेक करामती पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता ‘वीरा’च्या बछड्यांनी भर घातली आहे.