नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या नवनव्या करामती दररोज समोर येत आहेत.
या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील प्राचीन रामदेगी मंदिरात नेहमीच वाघोबा हनुमानाचे दर्शन घेताना दिसून येतात. मात्र, शनिवारी एक नाही तर दोन वाघांनी हनुमानाला चक्क प्रदक्षिणा घातली आणि तेथेच ठाण मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बजरंग” या वाघासोबत जखमी झालेला आणि लढाईत त्याला यमसदनी पाठवणारा ” छोटा मटका” अजूनही पूर्णपणे ठीक झालेला नाही. या “छोटा मटका” आणि “भानुसखिंडी” ची पिलावळ “डेडली बॉईज” या नावाने प्रसिद्ध आहेत. २० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर मारुतीरायासमोर नतमस्तक होत तेथेच त्यांनी ठाण मांडले. प्रकाश दुधकोर यांनी त्यांचा हा भक्तिमय प्रवास कॅमेऱ्यात टिपला. तर डेक्कन ड्रिफ्टचे पीयूष आकरे व कांचन पेठकर यांनी हा व्हिडीओ लोकसत्ताला उपलब्ध करून दिला.

हेही वाचा…मुंबई ते नागपूर अंतर जुलैपासून आठ तासांत; भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवेत

विदेशी पर्यटक वाघाच्या या भक्तिमय प्रवासाचे साक्षीदार ठरले. दक्षिण कोरियामधून आलेले अनिवासी भारतीय पर्यटक सौरभ शिरपूरकर हा क्षण डोळ्यात साठवत असतानाच भारावून गेले. या सफारी दरम्यान पर्यटक मार्गदर्शक नीलेश पेटकर व जिप्सी चालक प्रकाश दुधकोर हे उपस्थित होते. विशेष म्हणजे “छोटा मटका” देखील सातत्याने या मंदिरात हनुमानाचे दर्शन घेताना आढळून आला आहे. तर “डेडली बॉईज” त्याचाच वारसा पुढे चालवत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात नुकताच ताडोबा महोत्सव पार पडला. जगभरातील “सेलिब्रिटी” या महोत्सवात उपस्थित होते. महोत्सवादरम्यान चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते व्यस्त असतांना इकडे व्याघ्रप्रकल्पात सफारी करणाऱ्या पर्यटकांना हनुमानाच्या भक्तीत रंगलेल्या एक नाही तर दोन वाघांचे दर्शन झाले. त्यामुळे महोत्सवात सहभागी “सेलिब्रिटी”ना वाघांचा हा भक्तिमय प्रवास चुकवल्याची हुरहूर लागली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video two tigers at ramdegi temple of lord hanuman in tadoba andhari tiger reserve rgc 76 psg