नागपूर : खमंग.. चविष्ट.. व्यंजने राज्यातच नाही तर देशाबाहेर तेवढ्याच समर्थपणे पोहोचवणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या ‘विष्णूजी की रसोई’ की रसोईत तयार होणाऱ्या स्वयंपाकाची विशेषत: माहिती आहे का ! तीथे परंपरा तर जपली जाते, पण त्याहीपेक्षा स्वयंपाकाचा पहिला घास भरवला जातो, तो गरजू व्यक्तीला.
आश्चर्य वाटलं ना ! घरोघरी स्वयंपाक तयार केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो. नंतर कुणी तो नैवेद्य गाईला देतात, तर कुणी ते नैवेद्याचे ताट स्वत:च घेतात. ‘विष्णूजी की रसोई’ येथे देखील तयार होणाऱ्या स्वयंपाकाचा नैवेद्य दररोज देवाला दाखवला जातो, पण येथून विष्णू मनोहरांच्या दातृत्वाचा आणखी एक पैलू समोर येतो. देवाला दाखवलेल्या नैवेद्याचे ताट ना गाईला दिले जात, ना कुटुंबातला कुणी सदस्य त्या नैवेद्याचे ग्रहण करतो. ते नैवेद्याचे ताट व्यवस्थित पॅक केले जाते. सोबत पाण्याची बाटली ठेवली जाते आणि ही परिपूर्ण थाळी मग गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते.
एके दिवशी नैवेद्याचे ताट न्यायला बराच उशीर झाला. विष्णू मनोहर भूकेजलेल्या व्यक्तीच्या शोधात होते. शहरातील चौक त्यांनी पालथे घातले, पण कुणी मिळाले नाही. अचानक त्यांना धरमपेठच्या गल्लीत एक छोटा मुलगा दिसला. त्यांनी त्याल विचारले ‘तुला भूक लागलीय का’ आणि त्याने मान डोलावताच विष्णू मनोहरांनी त्याला ती थाळी आणि पाणी दिेले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्याने त्याच्या भूकेलेल्या बहिणीला बोलावले आणि तिला म्हणाला, ‘बघ, मी म्हणालो होतो ना, रात्रीच्या आधी जेवण मिळणार’ असे म्हणून ते दोघेही बहीणभाऊ जेवायला बसले. आपल्या आसपास अशी कितीतरी मुले असतात, त्यांना एकवेळचे जेवायला देखील मिळत नाही.
हेही वाचा >>>
विष्णूजी की रसोईची ही परंपरा नागपुरातच नाही तर अमेरिकेतही जपली जाते. तेथे त्यांना असेच काम करणारा एक नागपूरकर म्हणजेच जितू जोधपूरकर मिळाला. तो देखील ‘शेअर अवर स्ट्रेंग्थ’ या संस्थेमार्फत अमेरिकेत ‘नो कीड्स हंग्री’ या मिशनसाठी काम करतो. २०२५ पर्यंत भारतातल्या तीन मिलियन मुलांन मोफत जेऊ घालण्यासाठी तो भारतातल्याच अक्षयपत्र या संस्थेबरोबर काम करायला तयार झालाय. आता हे काम मध्यभारतात नागपूर पासून सुरु करण्याचा मानस विष्णू मनोहर व त्यांच्या मित्रांनी केलेला आहे. यासाठी नागपूरकर जनता मदत करेल अशी खात्री त्यांना आहे.