नागपूर : ‘आम्ही जी चादर जाळली, त्यावर ‘आयत’ नव्हती’, असे स्पष्टीकरण विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नागपुरात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेधच करतो, पण जी चादर जाळल्याचा आरोप आमच्यावर होत आहे, तो खोटा आहे. आम्ही चादर जाळली, पण त्यावर ‘आयत’ नव्हती, असे स्पष्टीकरण विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दंगलीचे आम्ही समर्थन करत नाही. या घटनेचा आम्ही निषेधच करतो. मात्र, हेही खरे आहे की नागपुरातील हिंसा हा नियोजित कटाचाच एक भाग होता. त्यामुळे ही हिंसा घडवून आणणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहीजे. औरंगजेबाला मानणारे लोक आजही आहेत. त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. या हिंसेनंतर विश्व हिंदू परिषदेवर मुस्लीम धर्माची हिरवी ‘आयत’ असलेली चादर जाळल्याचा आरोप हाेत आहे. हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. आम्ही जाळलेल्या चादरवर ‘आयत’ नव्हती. आम्ही कोणत्याही धर्माच्या कपड्यांना आग लावली नाही. आम्ही फक्त कपड्यांना आग लावली.
विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही भगवे झेंडे जाळता ते चालतं का, असा प्रश्नही या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान, नागपुरातील घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात लागलेल्या आगीत हिरव्या रंगाची चादर देखील टाकण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषदेने केलेला दावा खरा मानायचा का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात भगव्या रंगाला, तर मुस्लीम धर्मात हिरव्या रंगाला तर बौद्ध धर्मात निळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. त्या-त्या धर्माची ती ओळख आहे. त्यामुळे अशा धार्मिक दंगलीत जर त्या-त्या रंगाचे झेंडे, चादर जाळली जात असेल तर ती हिंसा आणखी मोठी होते. नागपुरातील या घटनेत मुस्लीम धर्मात महत्त्वाची असलेली हिरव्या रंगाची चादर जाळण्यात आली. मात्र, विश्व हिंदू परिषदेने ही बाब नाकारली आहे. आम्ही चादर जाळली, पण त्यावर ‘आयत’ नव्हती असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.