नागपूर : उपराजधानीत विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात लोकप्रतिनिधींचे वागणे पाहून मन विषण्ण होते. राज्य व विदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जे काही सुरू आहे ते पाहता हे अधिवेशन गुंडाळावे व विदर्भात येणाऱ्या पाहुण्यांनी परत जावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये होत असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी एक पत्र प्रसिद्धीला दिले आहे. त्यात ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भाला न्याय मिळावा म्हणून नागपूर, अकोला करार झाला. नागपूरमध्ये कमीत कमी एक महिन्यासाठी अधिवेशन असावे, असे ठरले. वैदर्भीय जनता या अधिवेशनाची वाट बघते. पूर्वी महाराष्ट्रातील अनेक नेते विदर्भात आल्यावर या भागातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांशी भेटून प्रश्न समजून घेत होते. विदर्भाची वेगळी संस्कृती आहे. मात्र, येथील कार्यकर्ते किंवा नेत्यांचा अवमान करण्याचे धाडस कुणी केले नाही.
लोकनेत्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा जनतेवर उमटवायचा असतो. राज्यघटनेचा सन्मान राखून लोकशाहीची बीजे वृध्दिंगत करणे ही नेत्यांची जबाबदारी असते. पण जो काही गदारोळ अधिवेशनादरम्यान पाहायला मिळाला तो बघता मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. देशात करोनाच्या संदर्भात उद्भवणारे प्रश्न, अर्थसंकल्पानंतर मंजूर करण्यात आलेली आर्थिक तरतूद, महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा किंवा विदर्भातील विविध प्रश्नांचा ऊहापोह, या सर्वाकडे दुर्लक्ष करून जे काही सुरू आहे, त्याला धिंगाणा म्हणावे का हे सुज्ञांनी ठरवावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापेक्षा हे अधिवेशन गुंडाळावे व विदर्भात येणाऱ्या पाहुण्यांनी परत जावे, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. पुढच्या वर्षी येताना महाराष्ट्रातील संस्कृतीचा आदर्श देशात निर्माण होईल, असा निर्धार करून या, आम्ही स्वागत करू; परंतु आता मात्र परत जा, असे संस्कृतीच्या विरोधात जाऊन जड अंत:करणाने एक सजग नागरिक म्हणून विनंती करतो, असे गिरीश गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.