नागपूर : स्वत:च्या बहिणीच्या कुटुंबातील पाचजणांचा निर्घृणपणे खून करणाऱ्या क्रूरकर्मा विवेक गुलाबराव पालटकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा आज, शनिवारी न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच वर्षांपूर्वी २०१८ मध्ये उपराजधानीसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पवनकर कुटुंबीय हत्याकांड प्रकरणातील आरोपी विवेक पालटकरविरुद्ध यापूर्वीच दोषारोप सिद्ध झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंदा साळूंके यांनी तपास करीत दोषारोपत्र सादर केले होते. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे आरोपीला फाशीचीच शिक्षा होण्याशी शक्यता होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश आर. एस. पावसकर यांच्यापुढे दोन्ही पक्षांनी फाशीवर युक्तिवाद केला होता. यात सरकारी पक्षाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ असून विवेकला फाशीच का दिली जावी, हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद केला. तसेच बचावपक्षाने फाशी टाळण्यासाठी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आज शनिवारी विवेकला फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा – ‘कुल’ बुलढाणा होतोय ‘हॉट’, तापमान ४० डिग्रीच्या घरात; शहरवासी त्रस्त

काय होते प्रकरण?

कमलाकर पवनकर हे आरोपी विवेक पालटकरचा मेहुणा होते. पालटकरने यापूर्वी पत्नीचा खून केला होता. त्या प्रकरणातून कमलाकर पवनकरनेच मदत करीत बाहेर काढले होते. पुढे कमलाकर आणि विवेक यांच्यात पैशावरून वाद झाले. १० जून २०१८ रोजी रात्री विवेक हा कमलाकर यांच्या घरी रात्रीच्या मुक्कामाने आला. सर्वजण झोपलेले असताना विवेकने रात्री तीनच्या सुमारास सब्बलने एकापाठोपाठ एक पाचही सदस्यांच्या डोक्यावर प्रहार करून हत्या केली.

हेही वाचा – अमरावती : समाज माध्‍यमावरून ओळख, नंतर आक्षेपार्ह चित्रफित काढून तरुणीवर अत्याचार‎; लग्नासही दिला नकार

मृतांमध्ये कमलाकर पवनकर, त्यांच्या पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती व भाचा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर यांचा समावेश होता. यातून विवेकची मुलगी वैष्णवी पालटकर व भाची मिताली पवनकर या दोघी बचावल्या होत्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek palatkar sentenced to death in pawankar murder case in nagpur adk 83 ssb