नागपूर : अलिकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असा सर्वांचा समज झाला आहे. त्यामुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे फारशी येताना दिसत नाही. परंतु आता शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे.विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (व्हीएनआयटी) नवे संशोधन केले असून त्याच्या वापराने शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘डबल’ करण्याची घाेषणा केंद्र सरकारने केली हाेती. ही घाेषणा सत्यात उतरेल, असा दावा व्हीएनआयटीचे प्रा. डाॅ. दिलीप पेशवे यांनी केला आहे.व्हीएनआयटी व देशातील इतर संशाेधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी हाेईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न २५० टक्के वाढेल, असा विश्वास डाॅ. पेशवे यांनी व्यक्त केला आहे.
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) येथे त्यांनी या यंत्राच्या उपयाेगितेचे सादरीकरण केले. ही यंत्र विशेषत: अल्पभूधारक शेतकऱ्यांना गृहित धरूनच तयार केल्याचे त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले. एका एकरातील गव्हाच्या पेरणीपासून ते मळणीपर्यंत साधारणत: २० ते २२ हजाराचा खर्च येताे.समजा त्यांचा गहू ३० हजारात विकला तर केवळ ८ ते १० हजाराचे उत्पन्न हाेईल. मात्र व्हीएनआयटीच्या तंत्राने शेती केल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कार्यासाठी केवळ ३५०० ते ४००० रुपये खर्च लागेल व २५,००० ते २६,००० नफा मिळेल, असा विश्वास डाॅ. पेशवे यांनी व्यक्त केला.
ही आहेत विकसित केलेली यंत्र
नांगरणीसाठी बूलक ट्रक्टर तयार केला. नांगरणीच्या औजारांना चाके लावली. यामुळे बैलावरील वजन कमी हाेईल आणि वेगाने नांगरणी हाेईल.पेरणीसाठी ड्रम सिडर : एक गाेल ड्रम आहे. त्यास टाेकदार छिद्र आहेत. या छिद्रातून धान्य जमिनीत पेरले जाईल. वेगाने काम हाेईल. निंदन काढण्यासाठी ‘विकल्प व्हिडर’ : निंदन करणाऱ्या महिला किंवा पुरुषांना अनेक तास शेतात बसून निंदन करावे लागते. ‘विकल्प व्हिडर’द्वारे एकच व्यक्ती वेगाने पिकांना हानी न पाेहचता शेतातील अनावश्यक तण काढू शकताे. यात आता लिथियम आयन बॅटरी लावली आहे, ज्यामुळे आवाज किंवा प्रदूषण हाेत नाही. विकल्प हार्वेस्टिंग : तासनतास विळ्याने पिक कापण्याची गरज नाही. एक किंवा दाेन व्यक्ती उभ्यानेच कमी वेळात पिकांची कापणी करू शकेल. मळणी यंत्रही आहे. शिवाय धान्य साेंगण्याचे ‘स्कायथे’ नावाचे यंत्र तयार केले आहे. याद्वारे शेतातील साैर पॅनलचा वापर करून शेतातच धान्याची साेंगणी करता येईल.विकल्प साेलर पंप : साैर ऊर्जेच्या मदतीने एका तासात २५,००० लीटर पाणी (साध्या पंपापेक्षा दुप्पट) देणे शक्य आहे.
पंचगव्याची खते, किटनाशके
खते किंवा किटनाशकांवर शेतकऱ्यांचा बराच पैसा जाताे. यावर उपाय म्हणून व्हीएनआयटीच्या केमिकल इंजिनियरिंग विभागाने गाेमुत्र व शेणापासून किटनाशके तयार केले आहेत. या पंचगव्याचा वापर केल्यास पिकांवर काेणताही राेग लागणार नाही. यामुळे खते व किटनाशकांचा २ ते ३ हजार रुपयांचा खर्च वाचेल. देशभरातील विविध संस्थाद्वारे यावर कार्य सुरू आहे. उत्तर प्रदेश, गुजरात अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी या यंत्रांचा उपयाेग सुरू केला आहे. विदर्भात आम्ही पाेहचू शकलाे नाही पण यापुढे विदर्भातही या तंत्राचा प्रचार प्रसार करण्यात येईल.
डाॅ. दिलीप पेशवे, विभाग प्रमुख, एमएमई, व्हीएनआयटी.