विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) १३ व्या पदवी प्रदान समारंभात सर विश्वेश्वरैय्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला प्रेम रमेश औटी याने तांत्रिक शिक्षण घेऊन पुण्याच्या बजाज ऑटोमध्ये उमेदवारी मिळविली असली तरी त्याचा मुख्य कल सामाजिक कार्याकडे आहे. त्यासाठी केंद्रीय नागरी सेवांच्या माध्यमातून समाजातील प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.
‘व्हीएनआयटी’ पदवी प्रदान समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या साक्षीने संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अर्थातच प्रेम ठरला. मॅकेनिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या प्रेमने सर्वाधिक क्युमिलिटिव्ह ग्रेड पॉईंट अॅव्हरेज (सीजीपीए) प्राप्त केल्याने तो राष्ट्रपती मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला. प्रेमने बी.टेक.च्या विद्यार्थ्यांंमध्ये सर्वाधिक म्हणजे ९.७६ पॉईंट प्राप्त केले. याशिवाय तीन वर्षांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला हेमंत करकरे स्मृती पारितोषिकानेही सन्मानित करण्यात आले.
पदवीप्राप्त भावी अभियंत्यांना त्यांनी पुढील आयुष्यात चांगला अभियंता होण्याची शपथ दिली. पुण्याच्या वायुसेनानगरातील हवाई दलाच्या केंद्रीय विद्यालयात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या प्रेमने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेतली, पण त्याची ओढ सामाजिक कार्यात आहे. त्याचे वडील रमेश औटी हवाई दलात तर आई चंद्रकला या गृहिणी आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलन काळात सामाजिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रेमने प्रयत्न केला. गेल्या वर्षी ‘व्हीएनआयटी’मध्ये झालेल्या परिसर मुलाखती अंतर्गत त्याची पुण्यातील बजाज ऑटोमोबाईल संशोधन आणि विकास विभागात निवड करण्यात आली. त्याला त्या ठिकाणी दोन वर्षांचा अनुभव घ्यायचा आहे. मात्र, त्याचे मुख्य ध्येय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचे आहे. त्यासाठी तो ‘यूपीएससी’चा अभ्यास करण्यावर भर देणार आहे. मात्र, एवढे सारे तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर नागरी सेवांकडे वळणे चुकीचे नसून त्यामुळे तंत्रज्ञानाची उपयोगिता माहिती करून घेण्यास उपयोगच झाला, असे तो म्हणाला.
प्रेमला सर विश्वेश्वरैया सुवर्णपदकाव्यतिरिक्त एन.जी. जोशी स्मृती पारितोषिक, डॉ. ए.जी. पैठणकर स्मृती सुवर्णपदक, डॉ. व्ही.व्ही. मिराशी स्मृती सुवर्णपदक, शैक्षणिक एक्सलन्स पारितोषिक, वाटवे शिक्षण संस्था पारितोषिक, हेमंत करकरे पारितोषिक, एस. पांगारकर स्मृती पारितोषिक आणि डॉ. व्ही. एन. जोशी स्मृती पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रेम बरोबरच ध्रुव चावला या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची उत्तम कामगिरी ठरली असून त्याने नऊ पुरस्कार प्राप्त केले. त्याचा सीजीपीए ९.३१ आहे. प्रेमनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सीजीपीए ९.३९ सुसमिद्धा शहा याने संपादित केले. त्याला सवरेत्कृष्ट शैक्षणिक कामिगरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

Story img Loader