नागपूर : समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघात होत आहेत. या अपघातांची कारणे शोधण्यासाठी नागपूरच्या विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआईटी)मधील ‘ट्रान्सपोर्ट’ विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी तीन महिने अभ्यास केला. त्यात सर्वाधिक अपघात ‘महामार्ग संमोहन’मुळे झाल्याचे पुढे आले आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर येथे प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली आहे. अपघाताची कारणे शोधण्यासाठी नागपूरच्या ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर तीन महिने नागपूरहून १०० किलोमीटर परिसरात अभ्यास केला. त्यात समृद्धीवरील अपघातासाठी ‘महामार्ग संमोहन’ जबाबदार असल्याचे निरीक्षणातून पुढे आले आहे.
जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो. कोणत्याच अडथळय़ांशिवाय, त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकाच मार्गे वेगात अनेक मिनिटे धावत असते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर घडत आहे. समृद्धी महामार्गावर अनेक चालक याचे बळी ठरले असून अपघाताच्या काही सेकंद आधी त्यांच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचे दिसून आले. ‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातांना कारणीभूत ठरल्याचे विभागाचे प्रमुख आणि प्रकल्पाचे मार्गदर्शक विश्रुत लांडगे यांनी सांगितले.
नियमांचे पालन नाही..
समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र ट्रॅक आहेत. त्यामुळे समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न नाही. समोरच्या वाहनाचा चालक आपली मार्गिका सोडून दुसऱ्या मार्गिर्केत जाताना नियमांचे पालन करत नाही. ‘महामार्ग संमोहन’ची क्रिया काम करत असल्याने चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचीही संधी मिळत नाही. त्यामुळे बाजूने धडक बसते. आजवर झालेल्या अपघातात ४० टक्के अपघात अशाच प्रकारे झाले आहेत. ‘समृद्धी’वर ३० टक्के छोटी वाहने व २० छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. ५१ टक्के ट्रकचालक मार्गिका पालन करत नाहीत. या महामार्गावर वळण मोजके असली तरी त्यांचा घेरा मोठा आहे. त्यामुळे चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. त्यामुळे चालकांकडून मार्गिका पालन न केल्याने ११ टक्के अपघात झाल्याचे अभ्यासात पुढे आले. टायर फुटणे हे ३४ टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. चालकाचे लक्ष विचलित झाल्याने २४ टक्के अपघात तर भ्रमणध्वनीचा वापर ८ टक्के अपघाताला कारणीभूत ठरला आहे.
अपघात कमी करण्यासाठी सूचना
प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूधबावरे या व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ‘महामार्ग संमोहन’पासून वाचण्यासाठी चालकाला मेंदू सक्रिय अवस्थेत ठेवण्यासाठी काही ठरावीक अंतरावर वेगवेगळे फलक लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज मार्गिकेनुसार विविध फलक ‘स्पीड कॅमेरा’, ‘सीसीटीव्ही’ ज्यामुळे चालक सावध राहील आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही.