मधुमेह, उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात यश; विविध क्षेत्रांतील २१ सदस्यांचा सहभाग
महेश बोकडे, नागपूर</strong>
व्हॉलीबॉल हे केवळ खेळाची ओळख सांगणारे साधन नाही तर ते आता निरोगी आरोग्याचा आधारही झाले आहे. होय, तुम्ही वाचताय ते खरे आहे. व्हॉलीबॉलचा नियमित सराव मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखीसह इतरही आजारांवर प्रभावी उपचार ठरत आहे. उद्योजक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी-अधिकारी अशा विविध क्षेत्रातील २१ जणांनी एकत्र येत मास्टर्स क्लबच्या मदतीने व्हॉलीबॉल खेळातून व्यायामाचा आगळा-वेगळा मार्ग शोधून काढला आहे. ३५ ते ६५ वयोगटातील सदस्य असलेला हा समूह गेल्या अनेक वर्षांपासून धरमपेठ भागात या खेळातून निरोगी आरोग्याबाबत जनजागृती करीत आहे.
बैठी जीवनशैली, खान-पानाच्या वाईट सवयी, व्यायामाच्या अभावामुळे सर्वच वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. सोबत कमी वयातच आता नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखीसह इतरही आजार दिसत आहेत. या आजारांपासून दूर राहणे वा तो असल्यास त्यावर नियंत्रणासाठी २०१० मध्ये सिव्हिल लाईन्स येथील प्रियदर्शनी कॉलनी येथे राहणाऱ्या आर.पी. चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीने काही परिचित व्यक्तींशी चर्चा करून व्हॉलीबॉल क्लब स्थापन करण्याचा विचार पुढे आणला. सुरुवातीला खेळासाठी आवश्यक सदस्य मिळाले नाहीत. मात्र २०११ मध्ये दहा जणांचा समूह जमल्यावर धरमपेठमधील वसंतनगर झोपडपट्टीच्या शेजारी विदर्भ व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मैदानात या खेळाला सुरुवात झाली.
हळूहळू यात उद्योजक, डॉक्टर, व्यवसायिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्ती या क्लबमध्ये सहभागी होऊ लागल्या. आता दहा वर्षांमध्ये ३५ ते ६५ वयोगटातील सदस्य असलेल्या क्लबची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे. या क्लबमध्ये अधून-मधून खेळायला येणाऱ्यांची संख्या बघितली तर ती संख्या आणखी जास्त आहे.
या क्लबमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये रोज सकाळी एक तास तर थंडी नसलेल्या दिवसांमध्ये नित्याने दोन ते अडीच तास व्हॉलीबॉल खेळून सर्वच सदस्य घाम गाळतात. यामुळे काहींचे वजन कमी झाले, काहींची मधुमेह व उच्च रक्तदाबाची औषधे कमी झाली, सांधेदुखीचाही त्रास कमी झाल्याचा काही सदस्यांचा अनुभव आहे.
क्लबचे सदस्य
शांतीलाल यादव, प्रवीण देशमुख, गोपाल माहूरकर, प्रभाकर निंबूळकर, सुधीर साखरे, देव मुखर्जी, शाशीन चंचानी, राजेश धाबू, पवन वर्मा, महेंद्र जिचकार, डॉ. सतीश नलगुंडवार, प्रवीण पालकर, अभय चिकाले, शैलेश तिवारी, दुर्गा मोहबे, संजय भिवगडे, अनंत दिवानजी, राजेंद्र गंगार्डे, भूपेंद्र शेखावत, दीपक जोशी, सुरेश शर्मा.
खेळण्याचे विशिष्ट वय असल्याचे म्हटले जाते, परंतु क्लबमध्ये खेळताना ही म्हणच चुकीची असल्याचा अनुभव आला. या क्लबमध्ये ९० टक्के सदस्य हे वयाची पन्नासी ओलांडलेले आहेत. सर्व सदस्य एकमेकांच्या मदतीलाही धावून येतात. क्लबकडून व्हॉलीबॉलच्या स्पर्धाचे आयोजन केले जाते.
– शैलेश तिवारी, उद्योजक
मास्टर्स क्लबमध्ये प्रथम सर्व सदस्यांकडून शाळेतील पीटीप्रमाणे व्यायाम, योगा करवून घेण्यात येते. त्यानंतर सगळे व्हॉलीबॉल खेळतात. त्यामुळे सर्वाचा ताण-तणावही कमी होण्यास मदत मिळते. मध्यंतरी क्लबमध्ये मधुमेह शिबीर घेण्यात आले होते.
– डॉ. सतीश नलगुंडवार, राज्य कामगार विमा रुग्णालय
२०११ मध्ये पाठीच्या हाडांमध्ये वेदना सुरू झाल्या. वैद्यकीय तपासणीत स्पॉन्डिलायसीसचे निदान झाले. अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्वच पॅथींचा अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतला, परंतु आराम मिळाला नाही. दरम्यान, एका मित्राने व्हॉलीबॉल खेळण्याचा सल्ला दिला.
– महेंद्र जिचकार