बहुतेकांचे पर्यावरणप्रेम नावापुरतेच
स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना गेल्या काही वर्षांत प्रचंड उधाण आलेले आहे. यापैकी किती जण ‘स्वयंसेवी’ या नावाला जागतात हा भाग अलहिदा, पण प्रसिद्धीचे वलय मात्र या नावाकडे लोकांना आकर्षित करीत आहे. पर्यावरण क्षेत्रातील अशाच काही स्वयंसेवक आणि त्यांच्या संस्थांची वास्तविकता गणेशोत्सवानिमित्त समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून विसर्जन सुरू झाले असताना एक-दोन ठिकाणे वगळता इतर ठिकाणी कुणीही स्वयंसेवी भटकले नाही.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि पर्यावरणपूरकच गणेशमूर्ती विसर्जनाकडे लोकांचा कल वाढत असल्याने या क्षेत्रातील स्वयंसेवी आणि त्यांच्या संस्थाही प्रसिद्धीसाठी त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी याच स्वयंसेवींची मदत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी घेण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या सुरुवातीला नागपूर महापालिकेने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी आणि त्यांच्या संस्थांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विसर्जनस्थळांची जबाबदारी स्वयंसेवींना वाटून दिली. मात्र, शहरात फेरफटका मारल्यानंतर काही मोजकी स्थळे सोडली तर कोणत्याही ठिकाणी ना स्वयंसेवी ना त्यांच्या संस्थांचा पत्ता होता. गणेश विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि अखेरच्या दिवशी केले जाते. दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी घरगुती गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या स्वयंसेवींनी दुसऱ्या दिवशीपासूनच विसर्जनस्थळी राहणे अपेक्षित असताना फुटाळा तलावाच्या वायुसेनानगराकडील बाजू, रामनगरचा कृत्रिम तलाव वगळता अंबाझरी, गांधीसागर, सोनेगाव या मोठय़ा गणेश विसर्जनस्थळी कुणीही नव्हते.
महानगरपालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून मोठय़ा अपेक्षेने त्याची जबाबदारी या स्वयंसेवी संस्थांवर सोपवली. मात्र, स्वयंसेवींच्या या उदासीनतेपुढे महापालिकेनेसुद्धा हात टेकले. अनेकजण नैसर्गिक तलावात निर्माल्याच्या प्लॅस्टिकसह गणेशमूर्ती विसर्जित करीत आहेत. फुटाळा तलावाच्या एका बाजूला पर्यावरण सांभाळले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र पर्यावरणाच्या विरुद्ध कृती केली जात आहे. अखेरच्या दिवशी प्रसारमाध्यमांकडून होणारे प्रसारण बघता गेली सात दिवस नावालाही नसलेले स्वयंसेवी अखेरच्यादिवशी मात्र विसर्जनस्थळी आवर्जून उपस्थित राहतील. त्यामुळे या स्वयंसेवींची ही सेवा केवळ प्रसिद्धी करताच अशीही प्रतिक्रिया आता उमटायला लागली आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनेच लोकसत्ताकडे ही खंत बोलून दाखवली. स्वयंसेवींच्या या भूमिकेमुळे ‘आम्ही मोर्चा जिंकलो, पण युद्ध मात्र’ हरलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader