लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत आहे. परंतु अद्यापही युती आणि आघाडीतील घटक पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. मध्य नागपुरात मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढतीचे संकेत आहे. परंतु अद्यापही येथे दोन्ही पक्षांकडून उमेदवार घोषीत करण्यात आला नाही. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मध्य नागपूरासाठी उमेदवार नाही. तर काँग्रेसकडूनही येथील उमेदवार कोण राहिल, याचे संकेतही दिले गेले नाही.

दरम्यान दोन्ही पक्ष मध्य नागपुरातील उमेदवारांबाबत बोलत नसल्याने अतिशय सावध पावले उचलतांना दिसत आहे. दरम्यान दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र येथील गैर हलबा उमेदवार देण्याबाबत चर्चा आहे. हे उमेदवार कधीही जाहिर होण्याची शक्यता असतांनाच आता हलबा समाजाच्या इशारा फलकाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. हलबा समाजाला जो पक्ष उमेदवारी देणार नाही, त्याच्याविरोधात संपूर्ण विदर्भात मतदान करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना धडकी भरली आहे.

आणखी वाचा-गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…

नागपूर जिल्ह्यातील काही मतदारसंघांत हलबा समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. विशेषतः मध्य नागपुरात तर हलबा समाजाच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथेदेखील हलबा मतदार आहेत. मध्य नागपुरातून २००९ सालापासून हलबा समाजाचे विकास कुंभारे यांच्यावरच भाजपने विश्वास टाकला. यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. हलबा समाजाने लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. मात्र, विधानसभेत मध्य नागपुरातून हलबा उमेदवार हवा, अशी मागणी जोर धरत आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी हलबा उमेदवारच द्यावा, असा समाजाचा आग्रह आहे. उमेदवार कोणताही द्या, मात्र तो समाजाचाच असावा, अशी भूमिका जोर धरते आहे. मध्य नागपुरातील काही ठिकाणी हलबा क्रांती सेनेतर्फे फलक लावण्यात आले आहेत.

आणखी वाचा-रवी राणांच्या नव्या दाव्यामुळे भाजपचा एक गट पुन्हा अस्‍वस्‍थ

विधानसभा निवडणुकीत हलबा समाजाला उमेदवारी न दिल्यास संपूर्ण विदर्भात हलबा समाज त्या राजकीय पक्षाविरोधात मतदान करेल, अशी भूमिकाच यातून मांडण्यात आली आहे. अशा बॅनरबाजीमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारीचा पेच मात्र वाढला आहे. या फलकानंतर येथे कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सगळ्याच राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

येत्या विधानसबा निवडणूकीत मध्य नागपुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढतीचे संकेत आहे. दोघांकडूनही अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नसतांनाच मध्य नागपुरात सध्या हलबा क्रांती सेनेच्या वेगवेगळ्या भागात लागलेल्या फलकाने युती, आघाडीसह इतरही राजकीय पक्षांचे टेंशन वाढवले आहे. फलकात हलबा समाजाला डावलणाऱ्यांविरोधात मदतानाचे आ‌वाहन केले गेले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vote against the oppressors of the halaba community mnb 82 mrj