लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : लोकसभा निवडणुका आटोपल्यात. कुण्या विधानसभा क्षेत्रात मतदारसंघात कोणत्या पक्षासाठी मताधिक्य यावर चर्चा रंगल्यात. कारण येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा लागणार, हे अपेक्षित धरून ही चर्चा झडते. वर्धा मतदारसंघातून अमर काळे निवडून आल्याने सर्वात अधिक लक्ष आर्वी विधानसभा मतदारसंघकडे लागले आहे. इथूनच काळे तीन वेळा आमदार झालेत. पुढेही तेच असे गृहीत पण अचानक लोकसभा निवडणूक लढवावी लागल्याने आता काँग्रेसीचा हा बालेकिल्ला कोण सांभाळणार, असा प्रश्न आला.

अमर काळे या नावाशिवाय दुसरे नावच नसल्याने व ते आता राष्ट्रवादी झाल्याने काय होणार, असे विचारल्या जाते. खुद्द काळे म्हणतात की आर्वी मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटच लढणार. त्यांनी या पक्षाची तिकीट घेण्यापूर्वी काही अटी टाकल्या होत्या. त्यात ते जरी राष्ट्रवादी तर्फे लढणार असले तरी आर्वी काँग्रेस कडेच राहणार, अशी प्रमुख अट होती. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या प्राथमिक चर्चेत हे पक्के झाले. पण पुढे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही अट फेटाळून लावली. पक्षाचा संभाव्य खासदार स्वतःचा विधानसभा मतदारसंघ कसा काय अन्य पक्षासाठी सोडू शकतो, असा पाटील यांचा सवाल राहला. पक्षाकडेच राहील व उमेदवारीची आणि आमदार निवडून आणण्याची जबाबदारी पण तुम्हालाच घ्यावी लागणार, असे काळे यांना स्पष्ट केल्या गेले. खासदार काळे म्हणाले की आर्वी व हिंगणघाट हे दोन मतदारसंघ आम्हीच लढणार.

आणखी वाचा-खळबळजनक! अमरावती कारागृहात चेंडूत आढळले स्‍फोटक पदार्थ

आता उमेदवार कोण, तर काळे यांच्या अर्धांगिनी मयुरा काळे याच. कारण दुसरे नावच नाही. स्वतः काळे म्हणतात की घरचाच उमेदवार देणे मला योग्य वाटत नाही. स्वतः तिची अजिबात इच्छा नाही. उमेदवारी दिली तर ती लादल्यासारखी होईल. अन्य पर्याय बघू. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुण ठरविणार, अशी भूमिका काळे यांनी मांडली. आर्वी काँग्रेस कडून राष्ट्रवादी कडे जाणार हे आता निश्चित झाले. तसेही मार्च १९८५ मध्ये काळे यांचे वडील दिवंगत डॉ. शरद काळे हे पवार यांच्या समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसचे श्रीधर ठाकरे यांना ४५६ मतांनी पराभूत करीत निवडून आले होते. आता परत हा मतदारसंघ पवार यांच्याकडे जाणार.

आणखी वाचा-उत्तम उपचारामुळे ‘एम्स’कडे ओढा वाढला.. मूत्रपिंडानंतर हृदय, यकृत प्रत्यारोपणही…

तर दुसरीकडे भाजप मध्ये उमेदवार कोण, असा प्रश्न आहे. विद्यमान आमदार दादाराव केचे यांची उमेदवारी राहणार कां, असा लाखमोलाचा सवाल चांगलाच चर्चेत आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडे यांचे नाव प्राधान्याने घेतल्या जाते. हा तीन वर्षात त्यांनी आर्वीत आणलेला निधी व केलेली कामे जिल्ह्यात चर्चेत आहे. भाजपच्या प्रत्येक बैठकीत त्यांचे मत गांभीर्याने घेतल्या जाते. त्यांचा वाढता प्रभाव हा केचे यांनाही खुपतो. केचे यांनी अप्रत्यक्षपणे टीका पण केली. माझ्याशिवाय आहेच कोण, असे पण आत्मविश्वासाने बोलतात. तर वानखेडे उमेदवारी बाबत भाष्य करीत नाही. पक्षाने सांगितले ते काम करायचे. आर्वीचा चौफेर विकास व्हावा हे माझे उद्दिष्ट आहे, असे ते बोलतात. मात्र आर्वी हा भाजपसाठी सर्वात वादाचा विषय ठरू शकतो, असे आर्वीतील जाणकार भाष्य करतात. एकूणच पक्षीय बदल व उमेदवारी कुणास, हे पैलू आज आर्वीत कानाकोपऱ्यात चर्चेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vote margin for which party in arvi vidhan sabha constituency pmd 64 mrj
Show comments