मतदार यादीतील एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या वस्त्यांच्या यादीमध्ये जोडली जात असल्याने तपासणी दरम्यान अडचणी येतात. त्यामुळे ही यादी आडनावाप्रमाणे (अल्फाबेटीकल ) तयार करावी ही केंद्र अधिकाऱ्यांनी (बीएलओ) केलेली विनंती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी योग्य ठरवत त्यानुसार मतदार यादी तयार करण्याचे संकेत दिले.

हेही वाचा >>> बुलढाणा : संप, अवकाळी अन् आता ‘रोजगार हटाव’! अडीचशेवर अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त

देशपांडे सध्या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मतदार यादी व मतदार नोंदणीच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेल बीएलओ उपस्थित होते. निवडणूक आयोगने अचूक मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यादीतून एक नाव दोन वेळा असलेली, मृत मतदारांची नावे तत्काळ वगळावी. निवडणुकीस अजून एक वर्षाचा कालावधी असून या काळात मतदार यादी अचूक करण्याचे काम बीएलओनी करावे, असे निर्देश देशपांडे यांनी दिले. नवमतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालयात जावे, अस्पष्ट छायाचित्र असणाऱ्या मतदारांना शोधून त्यांची नवीन छायाचित्रे काढावी. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी देशपांडे यांनी निवडणूक अधिकारी व मतदान केंद्राधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदार नोंदणीच्या कामाचा भार कमी करण्यासाठी नगरपरिषद व गटविकास अधिकारी यांनाही सामावून घ्यावी, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. त्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.