भंडारा : गावातील हक्काचे मतदान केंद्र हटविल्याच्या कारणावरून तुमसर तालुक्यातील आदिवासी सक्करधरा गावात मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला. घानोड येथील मतदान केंद्राकडे मतदार दिवसभर फिरकले नाही. सकाळपासून गावात शुकशुकाट दिसून आला. गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास बहिष्काराची भूमिका पुढील निवडणुकीतही कायम राहील, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.
सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात असणाऱ्या आदिवासी गावात असणारे मतदान केंद्र दोन किमी अंतरावरील घानोड गावात हटविण्यात आले आहे. हे केंद्र हटविल्यास लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल, असा इशारा यापूर्वीच गावातील मतदारांनी दिला होता. तहसीलदारांना निवेदनही दिले होते. महिनाभरापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मतदारांचे मतदान संदर्भात मन वळविण्याचे प्रयत्नही प्रशासकीय यंत्रणेकडून झाले नाही. गावात मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत असणारे हक्काचे मतदान केंद्र शेजारी असणाऱ्या घानोड गावात हटविण्याच्या निर्णयानंतर गावकऱ्यांनी आधी जाहीर केल्यानुसार मतदानावर बहिष्कार घातला.
हेही वाचा…नीलम गोऱ्हे म्हणतात,‘आंबेडकरी चळवळ संपविण्याचं काम…’
गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावांचे प्रशासकीय कामकाज १३ किमी अंतरावरील धुटेरा गावातून होत आहे. सहा गावे मिळून धुटेरा ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली आहे. परंतु, आदिवासीच्या हक्काच्या योजना, मूलभूत सुविधा, शासकीय योजना व अन्य योजना गावात पोहोचल्या नाहीत. गावात कधी सरपंच व सचिव गावात येत नसल्याने गावकऱ्यांना योजनांची माहिती होत नाहीत. गावात रोहयोचे कामे सुरू करण्यात येत नसल्याने गावकऱ्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.
ग्रामपंचायत दूर असल्याने घानोड आणि सक्करधरा अशा दोन गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. परंतु, सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, अशा अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. या मूलभूत प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीतही बहिष्काराचा निर्णय राहील, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…वय वर्षे १०६, तरुणांना लाजवेल अशी इच्छाशक्ती; मतदान केंद्रांवर जाऊन केलं मतदान
गावकऱ्यांच्या अडचणी कुणी ऐकून घेत नाहीत. गावात मतदान केंद्र पूर्ववत देण्यात यावे, हीच आमची मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास हा बहिष्कार पुढेही कायम राहील. – संजय सरोते, माजी ग्रामपंचायत सदस्य, सक्करधरा