नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गहाळ असल्याचे दिसून आले. मतदारांनी वेगवेगळ्या पक्षाकडील यादी तसेच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील यादीत नावे शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळ्या मतदान केंद्रावरही जावून चौकशी केली, पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. मतदार ओळखपत्र आहे, पण मतदार यादीत नाव नाही अशी होती. त्यामुळे शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक मतदान केंद्रावर नागरिकांच्या तक्रारी होत्या. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्रातील “एमटी” मालिकेतील अनेक मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत. १९९४ ला ज्यांनी मतदार नोंदणी केली त्यांना मिळालेल्या ओळख पत्राचा क्रमांक “एमटी” पासून सुरू होतो. उदा. MT/123/786/59837 अशी बरीच नावे मतदार यादीत नाहीत.
हेही वाचा…नागपुरात दडपशाही? भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे मतदार याद्यांमधून नावे गहाळ, मतदार म्हणतात…
काही मतदारांची नावे पाच किलोमीटर अंतरावरील केंद्रावर होती. सोनेगाव येथे राहणाऱ्या मतदारांची नावे गोरेवाडा केंद्रावर होती. सोनेगाव येथील कर्णबधीर शाळेतील मतदान केंद्र क्रमांक २७६ येथे दुपारी एक वाजेपर्यंत २२ मतदारांनी नाव गहाळ असल्याची तक्रार केली होती. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्यांना मतदारांना यावेळी मात्र मतदान करता आले नाही.
हेही वाचा…मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
निवडणूक आयोगाने त्यांना मतदार ओळख पत्र दिले, पण मतदान यादीतून नाव गहाळ करून त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेतला, अशी चर्चा या मतदान केंद्रावर होती. अशाप्रकारे मध्य नागपुरातील मोमीनपुरा येथील एका मतदान केंद्रावर एकाच कुटुंबातील सात नावे यादीतून गहाळ झाल्याची तक्रार आहे. या कुटुंबातील केवळ एका युवकाचे नाव यादीत होते. उर्वरित मतदारांची नावे गेली कोठे? असा सवाल मतदारांनी केली.