चंद्रपूर : आज, सोमवारी लोकसभेचे चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. महाराष्ट्र – तेलगंणाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांनी दुसऱ्यांना मतदान केले. विशेष म्हणजे, १४ गावातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेसाठी तर चौथ्या टप्प्यात तेलगंणातील आदिलाबाद लोकसभेसाठी मतदान केले आहे. त्यामुळे त्या चौदा गावातील नागरिकांनी दोनदा मतदानाचा अधिकार बजावला आहे.
तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील विवादीत १४ गावांतील मतदार या टप्प्यात मतदान करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील १४ गावे तेलंगणा सीमेला लागून आहेत. या गावांवर तेलंगणा व महाराष्ट्र सरकार आप-आपला अधिकार सांगतात. पण ही गावं मूळ महाराष्ट्रात आहेत. दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर राहिली आहेत. याचा फायदा घेत तेलंगणा सरकारनं या लोकांना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा देत आपल्याप्रती सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दोन्ही राज्यांमधील सरकारांच्या योजनांचा लाभ स्थानिक घेतात. स्वस्त धान्य असेल, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत. मतदानसुद्धा ते दोन्ही राज्यात करतात. तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत येथील लोक सहभाग घेतात. १४ एकूण ५ हजार ११७ मतदार आहेत. या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आहे. आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. मतदानासाठी गावकऱ्यांनी हजेरी लावली आहे.
हेही वाचा…लग्नातील पोशाखावरील वादामुळे हुंडा आणि बलात्काराची तक्रार, मग न्यायालयात गेले प्रकरण आणि…
विशेष म्हणजे, या १४ गावात महाराष्ट्रातील चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभेसाठी एकदाच मतदान व्हावे म्हणून दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली होती. तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तसे आवाहन देखील केले होते. यासाठी डाव्या हाताच्या बोटांवर पूर्ण काळी शाई देखील लावण्यात आली. मात्र, जिल्हा प्रशासनातर्फे केलेल्या उपाय योजनांना मतदारांनी प्रतिसाद दिला नाही व दोन्ही राज्यात मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी तेलंगाणा राज्यात मतदान होत आहे. यासाठी मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापुर, इंदिरानगर, येसापुर, पलसगुडा, भोलापठार,लेंडीगुडा या गावातील मतदारांनी आज मतदान केले. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार म्हणून घोषित केले आहे. त्यांना मतदार ओळखपत्रसुध्दा दिली आहे.