चंद्रपूर : तेलंगणमध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी सुरू असलेला प्रचारधुरळा महाराष्ट्रात पोहोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांतील ३ हजार ६०२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून, महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यांच्या सवलतींचा लाभ घेणारी ही गावे नेमक्या कोणत्या राज्याची, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जिवती हा तालुका असून, तालुक्यातील १४ गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगण सरकार आपापला दावा करतात. या गावांतील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आहे. येथील मतदार महाराष्ट्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यांतील निवडणुकीत मतदान करतात. महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगण सरकारने या गावात अधिक विकासात्मक
कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा तेलंगणकडे कल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जमिनीच्या पट्टय़ाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे जमिनीचा सातबारा आणि जमिनीचे पट्टे व मालकी हक्क मिळाले नसल्यामुळे संपूर्ण १४ गावांतील मराठी भाषिक नागरिक महाराष्ट्र सरकारवर नाराज असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले. तेलंगण सरकारने मात्र चौदाही गावातील काही नागरिकांना जमिनीचे पट्टे दिले आहेत.तेलंगणचे निवडणूक अधिकारी या भागातील तेलंगण जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाल्याचे दिसून येते. मुकदमगुडा, परमडोली, तांडा, कोटा, लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, नारायणगुडा, भो, लेंडीगुडा व कामतगुडा अशी या गावांची नावे आहेत. हे मतदार दोन्ही राज्यांच्या मतदारयादीत असून दोन्ही राज्यांनी त्यांना मतदार ओळखपत्रे दिली आहेत.
हेही वाचा >>>नागपूर : हिवाळी अधिवेशन काळात खोदकाम नको, महावितरण म्हणते…
आम्ही मराठी भाषिक नागरिक आहोत. परंतु, महाराष्ट्र शासनाने या १४ गावांतील नागरिकांसाठी जमिनीचे पट्टे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अनेक योजनांपासून वंचित आहेत. – रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ते, मुकदमगुडा
सध्या येथील आमदारांनी जमीन मोजणी प्रक्रिया भूमी अभिलेख विभागाकडून सुरू केली आहे. परंतु, कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करून मोजणीचे काम थांबवण्यात आले आहे. – बाळू पतंगे, सरपंच, मुकदमगुडा