वर्धा : जिल्ह्यातील चारही आमदारांनी बाजार समिती निवडणुकीत थेट उड्या घेतल्याने निवडणुका रंगतदार झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी देवळी व वर्धेत सहकार गट, तर हिंगणघाट येथे भाजपाचे आमदार समीर कुणावार यांना सोबत घेत उडी घेतली. त्यांना वर्धा, देवळी या बाजार समित्या ताब्यात येण्याची खात्री वाटते. हिंगणघाट येथे सहकार नेते सुधीर कोठारी बाजी मारतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
सेलूत आमदार डॉ. पंकज भोयर विरुद्ध सहकार नेते सुरेश देशमुख व काँग्रेसचे शेखर शेंडे अशी लढत असून आमदारांनी प्रथमच उडी घेतली आहे. आर्वी येथे आमदार दादाराव केचे तळ ठोकून आहेत. जिल्ह्यात दीड वर्ष विलंबाने होत असलेल्या या निवडणुकांत २५९ उमेदवार रिंगणात आहेत. आज चार ठिकाणी मतदान असून उर्वरित तीन ठिकाणी तीस एप्रिलला मतदान होणार.
निवडणुकांमध्ये काही ठिकाणी मतदारांसाठी घोडेबाजार भरला होता. त्याचे सावट आज दिसण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने सहकार नेतेच सूत्र सांभाळत असल्याने व त्यांचे पुत्र रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ची बाब ठरली आहे.