गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव व सडक अर्जुनी या दोन बाजार समित्यांसाठी भर पावसात मतदानास सुरुवात झाली आहे. १६ केंद्रावर पहिल्या तीन तासांत पावसामुळे तुरळक मतदार असल्याचे चित्र दिसून आले. यामुळे उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याची सोय केली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे मतदानात व्यतय येत असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज, रविवारी गोरेगाव आणि सडक अर्जुनी या दोन बाजार समित्यांसाठी १६ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. संचालकपदाच्या ३६ जागांसाठी ८८ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत चालणाऱ्या मतदानाच्या एका तासाने मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती सहायक उपनिबंधक प्रशांत सोणारकर यांनी दिली. सडक अर्जुनी येथे नाना पटोले यांच्या गटाला सहकार क्षेत्रापासून लांब ठेवण्याकरिता भाजपा – राष्ट्रवादी – शिवसेना अशी अभद्र युती झाली आहे. यामुळे येथे युतीचे पारडे जड वाटत आहे. तर गोरेगाव बाजार समितीत भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि काँग्रेसमध्येच फूट पडून झालेली बंडखोरी असा सामना रंगला आहे. यासह अनेक अपक्ष रिंगणात आहेत. यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा कोणाला लाभ होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा – सूरजागडच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, शेतीचे नुकसान; लोहखनिज वाहतुकीमुळे नागरिक हैराण

सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मतदार आणि उमेदवार यांच्यात धावपळ पाहण्यास मिळत आहे. तरीपण भर पावसात मतदार आपल्या मतांचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान बजावत आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील भाजपा पक्षाचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांची पत्नी शारदा राजकुमार बडोले या सेवा सहकारी महिला राखीव गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असल्यामुळे माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा – पहिल्या टप्प्यापासूनच उत्साह, धो धो मतदानाची चिन्हे; निवडणूक पाच बाजार समित्यांची

गोंदियात नुकत्याच लागलेल्या निकालाने भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अभद्र युतीची हवा काढली आहे. अपक्ष आणि काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलचा विजय झाल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील उमेदवारांमध्ये धाकधुक आहे. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. काय निकाल लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting for two market committees in gondia begins amid heavy rains sar 75 ssb
Show comments