विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये सोमवार सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरू असून दुपारी १२.०० वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी ३४.७० टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. मात्र, मतदान केंद्रावर मतपत्रिकांमुळे मतदानाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने मतदारांना तासंतास उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक मतदान केंद्रांवर लांबच्या लांब रांगाही पाहायला मिळाल्या.
हेही वाचा >>>नागपूर: मेळघाटात दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन; आठ नवीन प्रजातीची नोंद
शिक्षक मतदारसंघामध्ये पसंती क्रमांकाने मतदान होत असल्याने मतपत्रिकांचा वापर केला जातो. यामुळे मतदारांनाही पसंती क्रमांक देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदान केंद्रांवर अधिकच्या मतपेट्या ठेवण्याची आवश्यकता असल्याची मागणीही केली जात आहे. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षकांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. मात्र, मतदानाची संपूर्ण प्रक्रियाच संथगतीने सुरू असल्याने अनेकांना तासनतास उभे राहावे लागत आहे. निवृत्त शिक्षकांना याचा अधिक त्रास होत आहे.