लोकसत्ता टीम
बुलढाणा: जिल्ह्यातील उर्वरित पाच बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. मतदानाच्या प्रारंभिक टप्प्यातच उत्साही मतदानाची नोंद झाल्याने मतदानाची टक्केवारी नव्वदीचा आकडा पार करणार अशी चिन्हे आहेत.
आज सकाळी ८ वाजता २७ केंद्रावरून मतदानाला धडाक्यात सुरुवात झाली. जळगाव जामोद मधील चुरशीच्या लढतीचे प्रतिबिंब मतदानात देखील उमटले! सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान १२४१पैकी ३९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी ३२ टक्केच्या घरात पोहीचली. ३१.९९ टक्के मतदारांनी मतदान करून इतरांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. काट्याची लढत असलेल्या शेगाव मध्येही मतदाराचा उत्साह दिसून आला. तिथे दहा वाजेपर्यंत ९७९ पैकी २३२ जणांनी मतदान केले. २३.७० टक्के मतदान झाले.
आणखी वाचा- अकोला: जिल्ह्यात तीन बाजार समित्यांवर सहकार गटाचे वर्चस्व; अकोट व बार्शीटाकळीत आमदार मिटकरींना धक्का
शिंदे गट विरुद्ध आघाडी असा मुकाबला रंगलेल्या लोणार मध्ये १८ टक्के मतदान झाले. १७२४ पैकी ३११ मतदारांनी हक्क बजावला. आजीमाजी आमदारामधील जंगी मुकाबला ठरलेल्या चिखलीत १७.८० टक्के मतदानाची नोंद झाली असून ४६६ मतदारांनी मतदान केले. भाजप शिंदे गट विरुद्ध आघाडी अशी लढत असलेल्या नांदुरा मध्ये १६८९ पैकी २८३ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी १६.८६ इतकी आहे.