वाशीम : शासकीय कार्यालयात आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय कुठलेच काम होत नाही याची अनेक उदाहरणे ताजी असताना रिसोड तालुक्यातील पेनबोरी ग्रामपंचायतमध्ये २०१७ मध्ये मृत मधुकर शांतीराम बोरकर यांच्या नावावर चक्क २०२२-२०२३ मध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ४४ हजार ५३० रुपयाचे ‘व्हाउचर’ काढण्यात आले आहेत. गावात या नावाचे दुसरे कोणतेच गृहस्थ नाहीत. त्यामुळे पैसे कुणी काढले याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाचा कांगावा सरकार कितीही करीत असले तरी शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराने पोखरली आहेत. रिसोड तालुक्यातील पेनबोरी ग्रामपंचायतमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मधुकर शांतीराम बोरकर यांचे ३ फेब्रुवारी २०१७ ला निधन झाले. परंतु त्यांच्या नावावर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४४ हजार ५३० रुपयाचे व्हाउचर ग्राम स्वराजच्या संकेतस्थळावर त्यांचा मुलगा रवी मधुकर बोरकर यांना आढळून आले. ग्रामपंचायतमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंददेखील आहे. मग पैसे काढले कुणी असा प्रश्न उपस्थित होत असून मृताच्या नावावरदेखील भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रवी मधुकर बोरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.