नागपूर : एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासी विनातिकीट सापडल्यास वाहकांची तीन वर्षे वेतनवाढ रोखली जाणार आहे. या निर्णयाला वाहकांनी कडाडून विरोध केला असून तसे पत्र व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे.

एसटीमध्ये वाहक प्रवाशांना तिकीट घेण्याचे वारंवार आवाहन करतात. परंतु, त्यानंतरही गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी जाणीवपूर्वक तिकीट घेण्याचे टाळतात. काही प्रवासी लहान मुलांना मांडीवर घेऊन वय कमी सांगतात. अशावेळी तिकीट तपासणी पथकाला कुणी प्रवासी विनातिकीट आढळल्यास २०१८ पर्यंत ५० रुपये दंड ते जास्तीत जास्त ३ वर्षे वेतनवाढ रोखण्याची तरतूद करण्यात आली होती. ही शिक्षा प्रकरणाच्या गांभीर्यानुसार चौकशीनंतर सक्षम अधिकारी निश्चित करत होते. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण नसलेल्या वाहकांना ५० रुपये ते ५०० रुपयापर्यंत दंड व्हायचा. जाणीवपूर्वक तिकीट न देणाऱ्या वाहकाची १ वर्षे ते तीन वर्षांपर्यंत वेतनवाढ थांबवली जात होती.

हेही वाचा…लोकजागर : दीक्षाभूमी आंदोलनाचा ‘अर्थ’

परंतु, ३१ डिसेंबर २०१९ मध्ये महामंडळाने एसटी बसमध्ये विनातिकीट प्रवासी सापडल्यास वाहकाची सरसकट ५ वर्षे वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहकांमध्ये असंतोष वाढला. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा कालावधी कमी करून ३ वर्षे केला. तरीही वाहकांचा संताप कमी झालेला नाही. आधीच वेतन कमी असताना आमची आर्थिक कोंडी कशाला करता,? असा प्रश्न उपस्थित करणारे निवेदन व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले जात आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयासह इतर संबंधित विभागाला पाठवली जात आहे. याबाबत एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (कामगार व औद्योगिक संबंध) मोहनदास भरसट यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी, माहिती हवी असल्यास स्थानिक विभाग नियंत्रकांशी बोला. गंभीर प्रश्न असल्यास ते मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर उत्तर देऊ, असे सांगितले.

‘एसटी’ महामंडळाने वाहकांवरील अन्यायकारक शिक्षा रद्द करायला हवी. मान्यताप्राप्त संघटना या प्रकरणात कामगार न्यायालयातही लढत आहे. – अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, एसटी कामगार संघटना.

हेही वाचा…१५ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून आताचा गुन्हेगार ओळखता येणार…..नागपुरात नव्या तंत्रज्ञानामुळे….

एसटी महामंडळात सुमारे ३७ हजार वाहक

एसटी महामंडळात सुमारे ३७ हजार वाहक, ३७ हजार चालकांसह विविध संवर्गातील वर्ग १ ते चार पर्यंतचे ८० हजाराहून जास्त कर्मचारी- अधिकारी कार्यरत आहे. हे सगळे अधिकारी- कर्मचारी प्रवाश्यांना चोगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असतात.

हेही वाचा…कोकणानंतर आता ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा….वाचा कुठे आहे ‘ऑरेंज अलर्ट’..?

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमुद आहे.