लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गोंदिया, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारा येथे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडून दीड मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता वैनगंगा नदीची कारधा पाणी पातळी २४६. ३० एवढी नोंद करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर, धापेवाडा धरणांतून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीने रात्री ११.४५ वाजता धोक्याची पातळी ओलांडली. २०२०-२१ मध्ये आलेल्या महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तथापी भंडाऱ्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन दीड फुटावरून पाणी वाहत आहे.

आणखी वाचा-पंतप्रधान कुसुम योजना : अडीच हजार शेतकऱ्यांचे अर्ज रखडले, कारण काय? वाचा…

भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सकाळपासून गोसेचे ३३ दरवाजे उघडले असून १७, ००० मी क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, मेंढा, गणेशपुर, सागर तलावच्या मागचा भाग येथील येथील लोकांना विस्थापित केले जात आहे. ग्रामसेवक कॉलनी येथील एक घरात पाणी शिरले असून तेथील एका कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आले आहे. तर कारधा येथील घरांना पाणी लागल्यामुळे तीन कुटुंब ग्रामपंचायत येथे स्थलांतरित केले आहे

मोहाडी तालुक्यातील सर्व संभाव्य पूरस्थीतीच्या ठिकाणी नियंत्रित परिस्थिती आहे.स्थलांतरित करण्याची आवश्यकता पडणाऱ्या मुंढरी येथील नदीच्या स्थानिक धोक्याची पातळीपेक्षा अद्याप ४ फूट कमी आहे.

आणखी वाचा-बुलढाणा: चार दिवस पावसाचे… हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

सध्या संजय सरोवरचे ५ दरवाजे उघडले असून उद्यापर्यंत पाणी भंडारा जिल्ह्यात पोहचेल. तर धापेवाडा धरणाचे सर्व २३ दरवाजे उघडलेले असून त्यातून फ्री फ्लो सुरू आहे. जिल्ह्यात पवनी आणि मोहाडी तालुक्यातील अनेक रस्ते बंद झाल्याची माहिती आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मार्ग बंद

तामसवाडी गावाचे दोन्ही बाजूनी नाल्यास पाणी आले असून रस्ता ब्लॉक झाले आहेत मात्र पंजारा गावातून तामसवाडीला जात येते म्हणजेच ते गाव अजून पूर्णतः पाण्याने वेढले गेले नाही. रेंगेपार गावातील वैनगंगा नदीची पुराच्या पाण्याची पातळी रात्रीपेक्षा ५ फूटने वाढली आहे. परंतु गावात पाणी गेले नाही. सुकळी नकुल गावातील पाण्याची पातळी २ फूट ने वाढली आहे परंतु गावात पाणी गेले नाही. बपेरा आंतरराज्यीय वाहतूक पुलावरून पाणी असून रात्रीपेक्षा पाण्याची पातळी वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wainganga river crosses danger level flood situation in bhandara ksn 82 mrj
Show comments