एकनाथ शिंदेंनी स्वपक्षीय सरकारविरोधात पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेत देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेले असतानाच इकडे नागपूरमध्ये भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. “खरं तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बहुमत आहे की नाही हे विचारपूर्वक समजून घ्यावे आणि त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी योग्य निर्णय घ्यावा,” असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला आहे.
नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”
“भाजपला सध्या तरी बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे अल्पमत केव्हा उघडे पडेल, याची आम्ही वाट पाहतोय” असेही मुनगंटीवार म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”
राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अशा अस्थिर परिस्थितीमध्येही काही लोक शासकीय आदेश काढून पैसे कमावण्याच्या प्रयत्नात आहेत, असा गंभीर आरोपही मुनगंटीवार यांनी केला आहे. “असा प्रयत्न होत असल्याची शंका आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिले आणि अशा पत्रावर प्रशासनाकडून खुलासा घेणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे,” असेही मुनगंटीवार म्हणाले.
नक्की वाचा >> बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपाची तयारी?; फडणवीसांच्या घरी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना निर्देश
नक्की वाचा >> “पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा
“शिवसेनेत बंंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता का, याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. याबाबत संजय राऊत योग्य माहिती देऊ शकतील. राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करण्याची वेळ अजून आली नाही,” असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलंय. त्याचप्रमाणे, “जशी जशी महाराष्ट्राची परिस्थिती अस्थिर होईल, तेवढे राऊत यांचे मन चंचल आणि अस्थिर होईल. अस्थिर मनाने ते काय भाष्य करतील, याचा भरवसा नाही. आमची सध्याची भूमिका ही ‘वेट अँड वॉच’ची आहे. अशा भूमिकेला वेळेची बंधने नसतात,” अशा शब्दात मुनगंटीवार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.