नागपूर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर जवळील एका फार्महाऊसवर लपून बसला आहे, असा आरोप करण्यात आला होता. जर नागपूर आणि बीड पोलिसांनी गांभीर्य दाखवले असते तर वाल्मिक कराड हा नागपुरातच सापडला असता. त्याला नागपुरातच बेड्या ठोकण्यात आल्या असत्या. मात्र, वाल्मिक कराड खरचं नागपुरातील फार्महाऊसवर होता की निव्वळ अफवा होती, याबाबत पोलिसही संभ्रमात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात तपास सुरु असतानाच वाल्मिक कराड हे नाव समोर आले. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यानंतर बीडमधील कराडच्या दहशतीचे, अवैध धंद्यांचे, गुन्हेगारीचे अनेक प्रकरणे समोर येऊ लागले होते. याच प्रकरणासंदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हा घटनेच्या २१ दिवसांनंतर पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद करण्यात आला. तेव्हापासून वाल्मिक कराडचा शोध सुरु होता. गेल्या दोन दिवसांपासून सीआयडीने वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरु केली होती. तसेच त्याची बँक खाती गोठवून चांगलीच कोंडी केली होती.

हेही वाचा – सोने-चांदीच्या दरात घसरण… सरत्या वर्षात…

नागपुरातील हिवाळी अधिवेशनामधील चर्चेतही वाल्मिक कराडचा उल्लेख करत चर्चा झाली होती. वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हिवाळी अधिवेशन काळात तो नागपुरात आला होता. तो काही साथिदारांसह नागपूर जवळील एका फार्म हाऊसमध्ये पार्ट्या करीत होता, अशी गोपनीय माहिती नागपूर आणि बीड पोलिसांकडे होती. मात्र, अधिवेशनादरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराड याला सापळा रचून अटक करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे फार्महाऊसमध्ये काही दिवस मुक्काम ठोकल्यानंतर तेथूनही त्याने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – यवतमाळ : आरपीआय जिल्हाध्यक्षाचा शासकीय कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

कोण आहे हा वाल्मिक कराड?

बीड जिल्ह्यात मोठे राजकीय प्रस्थ असलेली व्यक्ती म्हणून वाल्मिक कराडची ओळख आहे. परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद भूषवलेला वाल्मिक कराड याने मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात वचक निर्माण केला आहे. यापूर्वी देखील वाल्मिक कराड हा कलम ३०७ सारख्या गुन्ह्यामुळे चर्चेत आला होता. आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे. केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडचे अगदी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबरच बीडच्या राजकारणातील मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम प्रोफाइलवर दिसतात. त्यामुळे त्याचे प्रस्थ मोठे असल्याचे बोलले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walmik karad nagpur police winter session dhananjay munde adk 83 ssb