नागपूर : जंगलातील अस्वले मधमाश्यांच्या पोळ्यातील मध काढून त्याची भाकरी करतात आणि मग त्या खातात, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही ना! नागझिऱ्यातील अस्वलांना मात्र ही सवय आहे. नवेगाव-नागझिऱ्यात वनखात्यात अनेक वर्षे सेवा देणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे हे निरीक्षण त्यांनी एका पुस्तकात दिले आहे. नागझिरा अभयारण्याचे पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी भाकरीसाठी रस्ता ओलांडणाऱ्या अस्वलांचे अख्खे कुटुंब कॅमेऱ्यात कैद केले आहे.
नागझिरा अभयारण्य आणि अस्वलांचा विषय निघणार नाही, असे होणे कधी शक्यच नाही. मारुती चितमपल्ली यांच्याकडून हे जंगल ऐकणे अधिकच आनंददायी. या जंगलात अस्वलांची संख्या अधिक आहे, पण प्रत्येकाला ते दिसतीलच असे नाही आणि अस्वलाचे कुटुंब दिसणे तर दुर्मिळच. इथल्या जंगलात अस्वल मधमाश्यांच्या पोळ्यातील मध आवडीने खातात. अन्नाची कमतरता भासू नये म्हणून त्या मधाच्या भाकरी करतात. त्या करताना त्यावर झाडांची पाने टाकतात आणि त्या सर्व भाकरी वारुळांमध्ये खोलवर लपवून ठेवतात.
हेही वाचा – ‘एमपीएससी’चे शुद्धीपत्रक जाहीर, या पदवीधरांनाच करता येणार अर्ज
आदिवासींना ही बाब माहिती असल्याने अनेकदा या भाकरी चोरायला ते येतात आणि मग अस्वले त्यांच्यावर हल्ले करतात. अस्वलाचा हल्ला म्हणजे सर्वात वाईट, कारण त्यांनी एक पंजा जरी मारला तरी चेहरा विद्रुप होतो. तो ‘ब्लाईंडनेस’ म्हणून ओळखला जातो, पण भडक रंग दिसला की लगेच आकर्षित होतो. मार्च आणि एप्रिल महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने नागझिऱ्याचे जंगल हिरवेगार झाले आणि या हिरव्यागार जंगलात अस्वलाच्या संपूर्ण कुटुंबाने भटकंती करतानाचा व्हिडीओ पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी टिपला.