नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सन आहे. दिवाळीत घरोघरी रोषणाई केली जाते. त्यामुळे वीज यंत्रणेवर ताण पडतो. या काळात वीज अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी काय करावे, हे आपण बघू या.
दिवाळीत रोषणाईमुळे विज यंत्रणेवर ताण पडत असल्याने विजेचा गरजेनुसार वापर करावा. कमी वीज लागणारे एलईडी दिवे वापरावे. दिवाळीतील सजावट, विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारण पुरेसे आहे, अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. फटाक्याने आग लागू नये म्हणून ते मोकळ्या जागेवर फोडावे. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत.
हेही वाचा – नागपूर : लोकप्रतिनिधींच्या घरांची जाळपोळ, तेली समाजाकडून निषेध, दिला इशारा
उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरू नये किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करून घ्यावेत. घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फटाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका, त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, असे महावितरणच्या नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले. दरम्यान दिवाळीत नागपुरकरांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज वाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल- दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची सूचनाही त्यांनी संबंधित महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना केली.