वर्धा : आधूनिक वाद्यांचा झंकार संगीताची व्याख्याच बदलून टाकणारा ठरत आहे. कर्णमधुर की कर्णकर्कश असाच प्रश्न हे संगीत वाद्य सूर ऐकून पडावा. मात्र पारंपरिक वाद्ये अद्याप आपली गोडी टिकवून असल्याचा प्रत्यय छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील बालोद येथून आलेल्या लोक कलाकारांच्या चमूने दिला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित राज्यशास्त्र परिषदेच्या निमित्ताने या कलाकारांनी सायंकाळच्या सत्रात लोककला सादर केली अन् अवघे सभागृह डोक्यावर घेतले.
ही छत्तीसगढी परंपरा असल्याचे नायक संजू सेन सांगतो. त्याने दुर्मिळ व लुप्त होत चाललेली १३५ पारंपरिक वाद्ये जतन केली आहेत. ही वाद्ये व पांडवनी, भरतारी, पंथी, कर्मा, दादरिया, नाचा, सेवा व अन्य नृत्यप्रकार संजू व त्याचे सहकारी सादर करतात. मंजिरी, खंजेरी, टिमकी, तीमतीमी, हुडका, बांस, शंख, चटका, मंदेरी, टेपडा, तूर्रा, खरताल, कर्तल, मुडदुंग, मोहरी,भैर अशी असंख्य वाद्ये ते संग्रही बाळगून आहेत.ढोल हे परिचित वाद्य अस्तित्वात येण्यापूर्वी खंजिरी हेच वाजायचे. घोरपडीच्या कातडीपासून ते तयार होत होते. आता ते धातूपासून तयार केले जाते. ही सर्व वाद्ये परिसरातील सहा जिल्ह्यातून संग्रहित करण्यात आली आहे. ही कला जतन करण्यासाठी संजू गावातील मुलांना गोळा करीत वाद्यकला शिकवीत आहे.त्याच्या आजोबांच्या काळापासून हे वाद्यस्वर निनादत आहेत.
हेही वाचा : शासकीय मेडिकल रुग्णालयामधील अमृत महोत्सव सोहळा पुन्हा वादात!
बहुतांश वाद्ये पशूंच्या कातडी, शिंगातून तयार केल्या जात असे. आता त्यावर मर्यादा आली आहे. जसे शिंगापासून तयार केले जाणारे तुरी हे मोठा गजर करणारे वाद्य आता पितळ व कथलपासून तयार केल्या जात आहे. एकेक वाद्य एकेक सूर. या कलेस प्रदर्शन, मेळा, स्पर्धा व अन्य माध्यमातून लोकप्रिय करण्याचे तसेच जतन करण्याचे ऐतिहासिक कार्य हे लोक कलाकार करीत आहे. त्यांना दाद न देणारा रसिकच नव्हे, असे म्हणावे लागेल.