वर्धा : लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्ससोबत काम करीत अमर काळे यांच्या विजयास हातभार लावणाऱ्या आम आदमी पार्टीने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारनिहाय भूमिका घेतली आहे. आप मध्येच पाठिंबा देण्याबाबत फूट पडण्याची चिन्हे असतांना असा निर्णय घ्यावा लागल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी स्पष्ट केले आहे.
आपतर्फे वर्धा विधानसभा मतदारसंघात आघाडीचे शेखर शेंडे यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार डॉ. सचिन पावडे यांना पाठिंबा देण्याचा आज निर्णय झाला. तसेच आर्वीत आघाडीच्या मयुरा काळे व हिंगणघाट येथे अतुल वांदिले यांना पाठिंबा देण्याचे ठरले असल्याचे जिल्हाध्यक्ष दोड यांनी सांगितले. देवळीत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला असून आघाडीचे रणजित कांबळे यांना पाठिंबा टाळण्यात आला आहे. काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी पाठिंबा देण्याची विनंती आप संघटनेस केली होती. मात्र त्यावरून संघटनेत फूट पडण्याची चिन्हे दिसून आले. काही शेंडे तर काही डॉ. पावडे म्हणाले. शेवटी सर्वांनी समजस्याने पावडे यांचे कार्य करण्यास कौल दिला. पक्षात फूट पाडण्याचे राजकीय प्रयत्न झाल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे. पावडे यांना समर्थन कां, यावर दोड म्हणाले की ते सुसंस्कृत, शिक्षित व भ्रष्टाचारचा आरोप नं झालेले नेते आहेत. धर्मनिरपेक्ष विचाराने सामाजिक चळवळी चालवितात. वर्धा व हिंगणघाट मतदारसंघात आमच्या सभा पण आयोजित असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा…महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
लोकसभा निवडणुकीत आप पक्षनेत्यांनी केलेले कार्य विजयासाठी पूरक ठरल्याची पावती खासदारांनी दिली आहे. तसेच कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान व सन्मान दिला. पुढे तसे आघाडीत दिसले नाही, असेही आप नेते स्पष्ट करतात. लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्स नेत्यांनी दाखविलेली एकजूट या विधानसभा निवडणुकीत मात्र दिसून येत नसल्याचे स्पष्ट आहे. असा वेगवेगळा पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेश नेत्यांना विचारून घेतला काय, या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष दोड म्हणाले की आम्ही घेतलेला निर्णय वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे. पाठिंब्याबाबत काही गाईडलाईन केंद्रीय संघटनेने घालून दिल्या आहेत. त्या चौकटीतच हा आमचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आपसह सर्व भाजप विरोधक हे लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत एकसंघ उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. तसेच भाजप विरोधक एक निर्धार ठेवून भाजप उमेदवाराचा पराभव करण्यात आघाडीवर आले होते.