वर्धा : खरा गुन्हेगार कोण हे ठरवतांना आलेला पेच शेवटी न्याय वैद्यकीय पुराव्याआधारे सुटला. येथील जिल्हा न्यायाधीश वर्ग एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम.अली यांनी या प्रकरणात आरोपी प्रियकरास दहा वर्ष सश्रम कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पीडित युवती ही एका शिक्षकाकडे खाजगी शिकवणीस जायची. तिने शिक्षक राहुल भारती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.आरोपीने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहली.शिक्षकच आरोपी असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले होते. पोलिसांनी मग पीडिता व शिक्षक या दोघांचा डीएनए वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. अहवालात बाळाचे वडील शिक्षक नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मग पुन्हा सखोल चौकशी सूरू केली. पीडितेचा प्रियकर तणवीर शहा गुलाम शहा,२४ यास ताब्यात घेण्यात आले. पीडितेस पुन्हा विचारणा करण्यात आली की कुणामुळे गर्भवती राहली. त्याचे उत्तर सांगू शकत नसल्याचे ती म्हणाली. मग आरोपी प्रियकराचा डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.या अहवालात पीडिता ही प्रियकरापासून गर्भवती झाल्याचे स्पष्ट झाले. प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पीडितेने शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाविरोधात साक्ष दिली. तसेच प्रियकरास ओळखत नसल्याचे सांगितले. आरोपी प्रियकरने जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्यावर त्या अर्जास पीडितेने होकार दिला. पीडिता व तिची आई या दोघी आरोपीचा बचाव तर शिक्षकांस फसवीण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी शिक्षक राहुल भारती विरोधात गुन्हा दाखल नं करता प्रियकर विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली.
हेही वाचा…शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
न्यायालयात शासकीय अधिवक्ता विनय आर. घुडे यांनी १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. स्वाती एन. गेडे यांनी कामकाज हाताळले. पीडितेस खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने नव्हे तर तिच्या प्रियकराने गर्भवती केले, असे युक्तीवादात सिद्ध झाले. त्यामुळे आरोपी प्रियकर तनवीर यास सजा ठोठावण्यात आली. तसेच शिक्षक राहुल भारती निर्दोष असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दुसऱ्या एका प्रकरणात नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीस गर्भवती करणाऱ्या अमित मरसकोल्हे या आरोपीस न्यायालयाने २० वर्षाचा कारावास ठोठवला आहे. जिल्हा न्यायाधीश ४ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. आदोने यांनी ही सजा सुनावली आहे. या प्रकरणात शासकीय अधिवक्ता म्हणून विनय आर. घुडे यांनी बाजू मांडली होती.