वर्धा : अंधश्रद्धा भारतीय समाजमनात किती घट्ट रुजून बसली आहे, त्याचे नवनवे प्रकार उजेडात येत आहे. विज्ञानाचे अद्भुत आविष्कार रोज पाहायला मिळत आहे. तर त्यास वाकुल्या दाखवीत अंधश्रद्धा फोफावत असल्याचेही प्रकार घडत आहेच. मांडूळ साप, वाघाचे कातडे, खवले मांजर विविध जादूटोना , दैवी शक्तीचे प्रयोग करण्यास उपयोगात आणले जातात. या प्राण्यांची तस्करी करणारे सध्या पोलिसांच्या ताब्यात असतांना अंधश्रद्धेचा घाऊक बाजार पकडल्या गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन्य जिवांबाबत आस्था ठेवून काम करणाऱ्या पीपल्स फॉर ऍनिमल्स या संघटनेने हा बाजार उजेडात आणला आहे. उत्तरप्रदेशातून ही टोळी आली. वर्धा पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार तक्रारकर्ता बाजारात असतांना त्यांच्याकडे दोन इसम आले. बाजूला टांगा व दोन घोडे होते. सदर दोघांनी तुमच्यावर काळी जादू करण्यात आल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले. ‘ काला जादू किया इसलिये आपका कोई भी काम होता नही, इससे छुटकारा पाना चाहते हो तो हमारे काले घोडे की नालसे बनी अंगुठी पहनो ‘ अशी या दोघांनी गळ घातली. आमच्या काळ्या घोड्याची नाल फलदायी आहे.नाल व आंगठी चमत्कारी असल्याने सर्व संकटे दूर होतील. आर्थिक भरभराट होईल, भूतबाधा दूर जाईल असेही सांगितलं.किंमत विचारल्यावर आंगठी ५०० रुपयात तर नाल ११०० रुपयात विकतो, असे सांगितले. विशेष म्हणजे हा घोडाबाजार माईक वरून ओरडत केल्या जात होता. पोलीस तक्रार झाली. आरोपी पकडण्यात आले.

शहजाद अली नासिर व मनीष विजयशंकर यादव रा. उन्नाव उत्तरप्रदेश अशी आरोपीची नावे आहेत. आज त्यांना न्यायालयात हजर केल्या जाणार. पोलिसांनी घोड्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी करुणाश्रम या अनाथ प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेवर सोपविली. काळ्या घोड्याची नाल सापडली की ती अत्यंत शुभ बाब समजली जाण्याची श्रद्धा आहे. म्हणून मुख्य द्वाराच्या मध्यभागी अशी नाल ठोकून घेणारे असंख्य आहेत. करुणाश्रमचे आशिष गोस्वामी म्हणाले असा प्रकार तर बेकायदेशीर आहेच. पण या भामट्यानी आणखी एक बनवाबनवी केली. तापकीरी रंगाच्या घोड्यांना पॉलिश मारून ते काळे केले. हात लावल्यावर ही बाब उघड झाल्याचे गोस्वामी यांनी सांगितले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध तसेच त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली.