वर्धा : राजकीय आयुष्य निवडले की एखादे तरी पद पदरात पडले पाहिजे, अशी मनिषा राजकीय कार्यकर्ता बाळगून असतो. पंचायत पातळीवर थोडीबहुत यशस्वी वाटचाल झाली की मग आमदारकीचे डोहाळे लागणे सूरू. हे चित्र प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याबाबत दिसून येते. येथे तर संघर्ष करीत विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहाचे सदस्य म्हणजे आमदार होण्याचा योग आल्याचा हा दाखला. म्हणून कार्यकर्त्यांनी पण त्यांचे संघर्ष योद्धा असे नवे नामकरण करून टाकले आहे.
दाखला आहे तो आर्वीचे दादाराव केचे यांचा. या परिसरात कमळाची शेती फुलविण्यात त्यांचे योगदान नाकारल्या जात नाही. संघर्ष करीत ते दोनदा भाजप आमदार झालेत. परत संधी हुकली तेव्हा बंडाचा झेंडा उभारला. त्यांचे हे पाऊल देशात गाजले. कारण खास चार्टर्ड विमानाने पक्षनेते व गृहमंत्री अमित शहा यांना त्यांना शब्द द्यावा लागला. ‘ मेरे पे भरोसा है की नही ‘ हे शहा यांचे बोल केचे यांनी मान्य केले आणि आता ते प्रत्यक्षात उतरले. त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. भाजपचे गोपीचंद पडळकर हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची रिक्त जागा केचे यांना देण्यात आली. दोन्ही सभागृहाचे सदस्य होणारे ते जिल्ह्यातील एकमेव नेते. असा बहुमान त्यांना मिळाला. मात्र अवधी केवळ १३ महिन्यांचा. पडळकर यांचा शिल्लक कालावधीच त्यांना लाभला आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

गावात आल्यावर आमदार दादाराव केचे यांची जंगी मिरवणूक निघाली. पंचक्रोशीतील त्यांचे स्नेही त्यात सहभागी झाल्याचे दिसून आले. ज्यांच्यामुळे विधानसभा हुकली ते आमदार सुमित वानखेडे पण या मिरवणूकीत पूर्णवेळ हजर राहले. आर्वीत अशी मिरवणूक कधी निघाली नव्हती, अशी पावती स्थानिक पत्रकार विजय अजमिरे देतात. संघर्ष योद्धा म्हणून केचे यांचा जयघोष झाला.

ते म्हणतात की अवघे १३ महिने मिळाले. पण हे देखील काम करण्यासाठी खूप आहेत. कामाला लागलो पण. काही रस्त्याचे प्रस्ताव घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाणार. ते पूर्ण करणार. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात भाजप विजयी करण्याचा चंग बांधला आहे. आमदार वानखेडे व मी असे दोन गट आर्वी भाजपात असल्याची होत असलेली चर्चा व्यर्थ आहे. फक्त भाजप आणि भाजप म्हणून मैदानात उतरणार, असे बोल केचे व्यक्त करतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha arvi mla dadarao keche became mla of both the houses pmd 64 css